sputnik v covid vaccine to arrive in india this month production to start in may envoy | Corona Vaccine : एप्रिल अखेरपर्यंत भारतात येईल Sputnik V लस; मे महिन्यात सुरू होईल उत्पादन

Corona Vaccine : एप्रिल अखेरपर्यंत भारतात येईल Sputnik V लस; मे महिन्यात सुरू होईल उत्पादन

नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला आणखीन गती मिळणार आहे. येत्या 10 दिवसांत रशियाच्या स्पुटनिक व्ही (Sputnik V) लसीची पहिली तुकडी भारतात येणार आहे. तसेच, देशात या लस निर्मितीचे काम सुद्धा मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय राजदूत बाला व्यंकटेश वर्मा यांनी ही माहिती दिली आहे. दरमहा हे उत्पादन 5 कोटी डोसचे असू शकते, अशी माहितीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे स्पुटनिक व्ही भारतात वापरली जाणारी कोरोनावरील तिसरी लस असणार आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सध्या भारतात कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, स्पुटनिक लसीची पहिली शिपमेंट या महिन्याच्या अखेरीस येईल आणि मे महिन्यात उत्पादन सुरू होईल. त्यानंतर यामध्ये हळूहळू वाढ केली जाईल, असे व्यंकटेश यांनी पत्रकारांना सांगितले. कोरोनावर मात करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रशियाच्या स्पुटनिक लसीला मान्यता देणारा भारत 60 वा देश बनला आहे.

गेल्या आठवड्यात डीसीजीआयने लसीला आपत्कालीन वापराच्या प्रक्रियेसाठी रजिस्टर केले आहे. रशियामध्ये घेण्यात आलेल्या क्लिनिकल चाचण्यांबरोबरच डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीच्या सहाय्याने अतिरिक्त तिसर्‍या टप्प्यातील लोकल चाचण्या घेण्यात आल्या. डॉक्टर रेड्डीजच्या लॅबने लसीच्या दराबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली होती. दरम्यान, सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केलेल्या ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॉजेनेकाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

"5 औषध कंपन्यांव्यतिरिक्त उत्पादन करारासाठी इतर कंपन्यांचा शोध घेत आहेत. आम्हाला वाटते की स्पुटनिक व्ही भारतीय-रशियन लस आहे, कारण जास्तकरून या लसीचे उत्पादन भारतात केले जाईल. आम्ही भारतातील मोठ्या औषध कंपन्यांसह भारतात पाच भागीदारांची जाहीर घोषणा केली आहे", असे आरडीआयएफचे (RDIF) मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रीव यांनी सांगितले. आधीच्या प्रसिद्धीनुसार, आरडीआयएफने भारताच्या ग्लँड फार्मा, हेटरो बायोफर्मा, पॅनाशिया बायोटेक, स्टेलिस बायोफार्मा आणि व्हर्चो बायोटेकशी करार केला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: sputnik v covid vaccine to arrive in india this month production to start in may envoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.