स्पाईस जेटच्या एअर हॉस्टेसची संपूर्ण कपडे उतरवून घेतली अंगझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 21:31 IST2018-03-31T21:31:12+5:302018-03-31T21:31:12+5:30
काही एअर हॉस्टेसेसना तर सॅनिटरी पॅडही काढायला लावल्याचा आरोप आहे.

स्पाईस जेटच्या एअर हॉस्टेसची संपूर्ण कपडे उतरवून घेतली अंगझडती
चेन्नई: भारतातील प्रमुख हवाई कंपन्यांपैकी एक असणाऱ्या स्पाईस जेटच्या बाबतीतील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पाईस जेटच्या विमानातील हवाई सुंदऱ्यांची (एअर हॉस्टेस) चेन्नई विमानतळावर कपडे काढून झडती घेण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या या एअर हॉस्टेसेसनी शनिवारी चेन्नई विमानतळावर निदर्शने केली. मात्र, स्पाईस जेटकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत.
एअर हॉस्टेसेसनी केलेल्या दाव्यानुसार, विमानातून उतरल्यानंतर त्यांची अंगझडती घेण्यात आली. विमानात खाद्यपदार्थ आणि काही वस्तू विकून मिळालेल्या पैशांचा घोटाळा झाल्यामुळे ही झडती घेण्यात आली होती. यावेळी सुरक्षारक्षकांनी काही एअर हॉस्टेसेसना तर सॅनिटरी पॅडही काढायला लावल्याचा आरोप आहे. यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला. मात्र, या सगळ्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होईल, असे आश्वासन दिल्यानंतर या कर्मचारी काम करण्यास राजी झाल्या.
तर दुसरीकडे चेन्नई विमानतळावरील स्पाईस जेटच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची झडती घेतल्याचे मान्य केले. परंतु कोणाचेही कपडे उतरवण्यात आले नाहीत. कंपनीच्या मालकीची कोणतीही वस्तू चोरीला जाऊ नये किंवा कर्मचाऱ्यांकडून तस्करीचे प्रकार घडू नयेत, या उद्देशाने ही झडती घेण्यात आली होती. ज्याप्रमाणे विमानातील प्रवाशांची झडती घेण्यात येते, त्याचप्रकारे ही झडती घेण्यात आल्याचे स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले.