‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 12:12 IST2025-10-27T12:10:19+5:302025-10-27T12:12:49+5:30
Harjinder Singh Deported Indian From USA: डोनाल्ड ट्रम्प हे गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी देशात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक भारतीय व्यक्तींचाही समावेश आहे. हल्लीच अमेरिकेने ५० भारतीयांना डिपोर्ट केलं आहे.

‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
डोनाल्ड ट्रम्प हे गतवर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून त्यांनी देशात बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा धडाका लावला आहे. अमेरिकेतून बाहेर काढण्यात आलेल्या लोकांमध्ये अनेक भारतीय व्यक्तींचाही समावेश आहे. हल्लीच अमेरिकेने ५० भारतीयांना डिपोर्ट केलं आहे. त्यात हरयाणातील अंबाला येथील जगोली गावातील हरजिंदर सिंह याचाही समावेश आहे. तो फ्लोरिडामधील जॅक्सन वेल येथे आचारी म्हणून नोकरी करण्यासाठी गेला होता.
हरजिंदर सिंह याने अमेरिकेत जाण्यासाठी आई-वडिलांना पै पै जोडून उभे केलेले ३५ लाख रुपये खर्च केले होते. अमेरिकेत जाऊन चांगली कमाई करून कुटुंबीयांचं भविष्य सुधारू, असं स्वप्न त्यानं पाहिलं होतं. मात्र त्याचं हे स्वप्न अमेरिकन सरकारने केलेल्या कारवाईमुळे उद्ध्वस्त झालं.
हरजिंदर सिंह याने अमेरिकन प्रशासनाने त्याला आणि इतर भारतीयांना पकडून कसे देशाबाहेर काढले. तसेच या सर्वांना सुमारे २५ तास बेड्यांमध्ये जखडून कसे ठेवण्यात आले, याची थरकाप उडवणारी माहिती दिली आहे. पायात बेड्या धालून ठेवल्याने हरजिंदर सिंह याच्या पायांना सूज आली होती. अमेरिकेतून अगदी अपमानास्पदरीत्या हाकलून देण्यात आल्याने हरजिंदर आणि इतरांसाठी अमेरिकेत जाणं वाईट स्वप्नासारखं ठरलं आहे. आता हरजिंदर याने त्याच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाचा निषेध केला आहे. तसेच भारत सरकारने मदत करावी, अशी विनंती केली आहे.
हरजिंदर सिंह याने सांगितले की, केवळ रोजगार शोधण्यासाठी आपले कुटुंबीय, घर यापासून हजारो किलोमीटर दूर जाणं सोपं नव्हतं. ज्याची मेहनतीची कमाई आणि स्वप्नं उद्ध्वस्त झाली आहेत, अशीच व्यक्ती माझं दु:ख समजू शकते. जर सरकारने भारतातच तरुणांसाठी चांगले काम उपलब्ध झालं तर कुणी नाईलाजास्तवर परदेशात जाणार नाही.