सुनंदा यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक
By Admin | Updated: January 7, 2015 23:55 IST2015-01-07T23:55:39+5:302015-01-07T23:55:39+5:30
सुनंदा यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका पत्राने या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे़

सुनंदा यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष पथक
शशी थरूर यांचा आरोप : दिल्ली पोलिसांकडून घरगड्याचा शारीरिक, मानसिक छळ
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणाचे गूढ वाढलेले असतानाच, सुनंदा यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या एका पत्राने या प्रकरणाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे़ दिल्ली पोलिसांकडून आपल्या एका घरगड्यावर दबाव टाकण्यात येत असून त्याचा शारीरिक व मानसिक छळ सुरू असल्याचा आरोप, थरूर यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे़ मी आणि माझ्या घरगड्याने मिळून सुनंदाची हत्या केल्याचे कबूल करावे, यासाठी हा दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप यात थरूर यांनी केला आहे़
या संपूर्ण घडामोडीदरम्यान थरूर यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना गत १२ नोव्हेंबरला लिहिलेले एक पत्र उघड झाले आहे़ या पत्रात थरूर यांनी त्यांच्या नारायणसिंग नामक घरगड्यावर पोलीस दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे़ मी स्वत: आणि माझे सहकारी सुनंदा प्रकरणाच्या तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य करीत आहे़ अशा स्थितीत माझ्या घरगड्यावर अशाप्रकारे दबाव टाकणे आणि त्याला मारहाण करणे, हे माझ्यासाठी धक्कादायक आहे, असे थरूर यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे़
दरम्यान सुनंदा यांच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे़ या पथकाने बुधवारी आपला तपास सुरू केला़ दरम्यान हे हत्येचे प्रकरण आहे, हे मानण्यामागे सकृतदर्शनी अनेक कारणे असल्याचे दिल्लीचे पोलीस आयुक्त बी़एस़बस्सी यांनी म्हटले आहे़
सुनंदांच्या मृत्यूच्या वर्षभरानंतर गुन्हा का? असे विचारले असता बस्सी यांनी सांगितले की, एम्सच्या अंतिम अहवालानंतर एफआयआर दाखल करणे गरजेचे झाले होते़ याप्रकरणी थरूर यांची चौकशी होणार का? असे विचारले असता, अशी शक्यता नाकारता येणार नसल्याचे ते म्हणाले़ तपासकर्त्यांनी सुनंदा यांचे विसेरा नमुने ब्रिटन वा अमेरिकेच्या प्रयोगशाळेत पाठविण्याची तयारी चालवली आहे़ जेणेकरून सुनंदा यांना देण्यात आलेल्या विषाबाबत माहिती मिळू शकेल़ सुनंदांना रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्यात आल्याचे मानले जाते़ भारतीय प्रयोगशाळेत या विषाचा शोध अशक्य आहे़
(लोकमत न्यूज नेटवर्क)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या पथकाने केरळच्या तिरुवनंतपूरम येथे एका रुग्णालयाचा दौरा केला़ सुनंदा मृत्यूच्या काही दिवस आधी या रुग्णालयात भरती होत्या़ एसआयटीकडून थरूर यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि खासगी कर्मचारी तसेच सुनंदांचा मृत्यू झालेल्या पंचतारांकित हॉटेलच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी होऊ शकते़ हॉटेलच्या डॉक्टरचीही चौकशी होऊ शकते़ या डॉक्टरनेच सुनंदा यांना मृत घोषित केले होते़
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूसंदर्भात एम्सच्या वैद्यकीय बोर्डाने दिलेल्या अहवालात, हत्या झाल्याचा उल्लेख नसून केवळ विष हे मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले आहे़ एम्सच्या याच अहवालाच्या आधारावर मंगळवारी दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता़
बुधवारी या बोर्डाचे प्रमुख सुधीर गुप्ता यांनी सांगितले की, आमच्या अहवालात मृत्यू हत्या असल्याचे म्हटलेले नाही़
केवळ विषाने मृत्यू झालेला आहे, एवढेच आमच्या अहवालात नमूद आहे़ आता पुढील तपास करणे पोलिसांची जबाबदारी आहे़