CoronaVirus News: फक्त काही आठवडे द्या! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात लस कंपन्या लागल्या कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 13:16 IST2021-11-28T13:16:29+5:302021-11-28T13:16:48+5:30
CoronaVirus News: कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटविरोधात लस निर्मिती सुरू; दिग्गज कंपन्या कामाला लागल्या

CoronaVirus News: फक्त काही आठवडे द्या! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात लस कंपन्या लागल्या कामाला
नवी दिल्ली: आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट लसीचा प्रभाव निष्क्रिय करत असल्याचं आतापर्यंत समोर आलं आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट आल्यास त्याप्रमाणे लसदेखील अपडेट करावी लागेल, असं अनेक शास्त्रज्ञांना वाटतं. त्यामुळेच ओमिक्रॉन समोर येताच लस कंपन्यांनी या व्हेरिएंटविरोधात काम सुरू केलं आहे.
नव्या व्हेरिएंटला लक्ष्य करू शकणाऱ्या लसीवर काम सुरू केल्याची माहिती अमेरिकन कंपनी नोवावॅक्सनं दिली आहे. पुढील काही आठवड्यांमध्येच लसीची चाचणी होईल आणि त्यानंतर आम्ही उत्पादनासाठी सज्ज असू, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नव्या व्हेरिएंटविरोधात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं प्रोटिन स्पाईक तयार करण्याचं काम नोवावॅक्सकडून सुरू आहे.
जर्मन कंपनी बायोएनटेक आणि अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सननं तयार केलेल्या लसीची ओमिक्रॉनविरोधात चाचणी सुरू आहे. आणखी एक अमेरिकन कंपनी इनोविओ फार्मास्युटिकल्सनंदेखील नव्या व्हेरिएंटविरोधात लसीची चाचणी सुरू केली आहे. दोन आठवड्यांत या चाचण्यांचे निष्कर्ष पुढे येतील.
कोविडचा नवा व्हेरिएंट काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. हा व्हेरिएंट धोकादायक असल्याचा इशारा शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेनं दिला. त्या व्हेरिएंटला ओमिक्रॉन असं नाव देण्यात आलं. हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक घातक आहे.