जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 20:20 IST2024-11-08T20:19:27+5:302024-11-08T20:20:33+5:30
Sopore Encounter: श्रीनगर ग्रेनड हल्ल्याप्रकरणी 3 दहशतवादी साथीदारांना अटक.

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Jammu Kashmir Encounter : दहशतवादाविरोधात भारतीय लष्कराला जम्मू-काश्मीरमध्ये मोठे यश मिळाले आहे. शुक्रवारी (08 नोव्हेंबर) सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात दोन दहशतवादी मारले गेले. याशिवाय, श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
सोपोर चकमकीबाबत ब्रिगेडियर दीपक मोहन म्हणाले, "7 नोव्हेंबरच्या संध्याकाळी आम्हाला 2 दहशतवादी पाणीपुरा गावात लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि CRPF यांनी संयुक्तपणे शोध मोहिम राबवली. या कारवाईत दोन दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे."
रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी अटक
दरम्यान, पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित तीन दहशतवादी साथीदारांना शुक्रवारी (08 नोव्हेंबर) श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. रविवारी झालेल्या या हल्ल्यात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यात आले असून, त्यात 12 नागरिक जखमी झाले होते. काश्मीर झोनचे पोलिस महानिरीक्षक व्हीके बिर्डी म्हणाले, "अटक करण्यात आलेल्यांची नावे उसामा यासीन शेख, उमर फैयाज शेख आणि अफनान मन्सूर शेख अशी आहेत. तिघेही शहरातील इखराजपोरा भागातील रहिवासी आहेत. हा हल्ला पाकिस्तानस्थित दहशतवादी मास्टर्सच्या इशाऱ्यावर करण्यात आला होता."