दोन पक्षांनी राज्यसभेची ऑफर दिली होती, पण...; आयटीच्या धाडीनंतर सोनू सूदचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 23:14 IST2021-09-21T23:11:37+5:302021-09-21T23:14:40+5:30
सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाचे छापे; २० कोटींची करचोरी केल्याचा आरोप

दोन पक्षांनी राज्यसभेची ऑफर दिली होती, पण...; आयटीच्या धाडीनंतर सोनू सूदचा गौप्यस्फोट
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर विभागानं काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या. सोनू सूदशी संबंधित तब्बल २८ ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. सोनू सूदनं २० कोटी रुपयांची कर चोरी केल्याची माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली. अधिकाऱ्यांना छाप्यादरम्यान ८ लाखांची रोख आणि ११ लॉकर्सची माहिती मिळाली. कायद्याच्या चौकटीत राहून काम करत असून प्रत्येक पैसा जनतेसाठी खर्च करत असल्याचं सोनूनं धाडींनंतर सांगितलं.
मला दोन पक्षांनी राज्यसभेची जागा देऊ केली. मला राज्यसभेची ऑफर होती. पण राजकारणात येण्यासाठी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हतो, असं सोनूनं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 'आयकर विभागाच्या पथकानं मागितलेल्या कागदपत्रांची पूर्तता माझ्याकडून करण्यात आली. त्यांना आवश्यक असलेले तपशील दिले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी त्यांचं काम केलं आणि मी माझं काम केलं. मी अजूनही कागदपत्रं देत आहे. हा प्रक्रियेचा एक भाग आहे,' असं सोनू म्हणाला.
गाड्यांमध्ये लागणार सेन्सर्स, चालकाची नोकरी पायलटप्रमाणे; गडकरी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत
याआधी सोनूनं एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधत स्वत:ची बाजू मांडली होती. 'सगळ्या गोष्टी प्रक्रियेनुसार सुरू आहेत. आम्ही आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मागितलेली माहिती दिली आहे. अधिकारी त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत आणि मी माझं काम करत आहे,' असं सोनूनं म्हटलं. आम आदमी पक्षाच्या अभियानाचे ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून तुमची नियुक्ती झाल्यामुळे छापे पडत आहेत का, असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर जनतेच्या कामासाठी मला कुठेही बोलवा. मला राजस्थान, गुजरात, पंजाबला बोलावलं, तरीही मी ब्रँड ऍम्बेसेडर होईन, असं सूद म्हणाला.