काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 06:28 IST2019-08-10T23:00:56+5:302019-08-11T06:28:26+5:30

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. 

Sonia Gandhi is the new Congress president | काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी अखेर सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गांधी कुटुंबातील कुठलीही व्यक्ती काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तेव्हापासून काँग्रेसमध्ये नव्या अध्यक्षाचा शोध सुरू होता. मात्र आज झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीची बैठकीत अध्यक्षपदासाठी कुठल्याही नेत्याच्या नावावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अखेरीस सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. 


राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी, ७५ दिवसांनी झालेल्या काँग्रेस कार्य समितीच्या बैठकीत पक्षाच्या घटनेनुसार नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कार्य समितीने राहुल गांधी यांनी दिलेला राजीनामा मंजूर केला आहे.

सोनिया गांधी १९९८ ते २०१७ या कालखंडात १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्याही त्या अध्यक्ष आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने काँग्रेस दोन लोकसभा निवडणुकांना सामोरी गेली.
काँग्रेस नेत्यांच्या सकाळी झालेल्या बैठकीतच नव्या अध्यक्षाचे नाव निश्चित केले जाईल, अशी अपेक्षा होती. पण त्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा झाली. तसेच नव्या अध्यक्षाची निवड करण्यासाठी पाच गट तयार केले. या गटांनी

प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, रात्री पक्षाध्यक्ष वा हंगामी अध्यक्ष निश्चित केला जाईल, तसे न झाल्यास पुढील व्यवस्था काय असावी, हे नक्की केले जाईल. त्यांच्या बोलण्यातून रात्री नऊ वाजेपर्यंत नव्या अध्यक्षाबाबतचा निर्णय अपेक्षित होते.
काँग्रेसच्या कार्यालयात रात्री आठ वाजता बैठक सुरू होणार होती. प्रत्यक्षात ती साडेआठ वाजण्याच्या सुमारास सुरू झाली. त्यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पक्षाचे सर्व नेते तसेच पाच गटांमध्ये सहभागी झालेले नेते उपस्थित होते. मात्र राहुल गांधी यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे जाणीवपूर्वक टाळले. आपल्या उपस्थितीत नव्या अध्यक्षाची निवड करू नये, असे त्यांनी आधीच जाहीर केले होते.

रात्रीच्या बैठकीत सर्वच गटांच्या प्रमुखांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदी राहावे, असा आग्रह धरला. गटांच्या बैठकीतही राहुल गांधी यांनीच अध्यक्ष असावे, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही बैठक लांबत गेली. राहुल गांधी यांच्याशिवाय दुसरे नावच सुचविण्यात न आल्याने पुन्हा अध्यक्षपदाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली. मात्र विविध गटांच्या चर्चेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, मध्य प्रदेशातील नेते ज्योतिरादित्य शिंदे, महाराष्ट्रातून सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा, केरळमधील ए. के. अँथनी, ओमन चंडी, ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम, कॅप्टन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग अशा अनेक नावांवर चर्चा झाली. पण या नेत्यांची मात्र पक्षाध्यक्षपद स्वीकारण्यास तयारी नव्हती, असे सांगण्यात येत होते. तसेच कोणत्याही एका विशिष्ट नावावर पाच गटांमध्ये मिळून एकमत झाले नसल्याचे रात्रीच्या बैठकीत लक्षात आले.


लोकसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्याने राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो मागे घ्यावा, यासाठी सर्वच नेत्यांनी विनंती केली. पण राजीनामा अजिबात मागे घेणार नाही, तुम्ही नेत्यांनीच नवा अध्यक्ष निवडावा आणि गांधी कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष असू नये, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

Web Title: Sonia Gandhi is the new Congress president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.