बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन
By Admin | Updated: July 14, 2017 18:09 IST2017-07-14T17:58:43+5:302017-07-14T18:09:58+5:30
लालू आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारमधील महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.

बिहारमध्ये सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींचा नितीश कुमारांना फोन
ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 14- बिहारमधील महागठबंधनचे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शुक्रवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. लालू आणि त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे बिहारमधील महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे. उपमुख्यमंत्री असलेला लालुंचा मुलगा तेजस्वी यादववर भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
नितीश कुमारांनी या प्रकरणी कणखर भूमिका घेत तेजस्वी यादव संबंधी निर्णय घेण्यासाठी लालुंना चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ असावी असा नितीश कुमारांचा आग्रह आहे. त्यामुळे तेजस्वी यादव यांनी मंत्रिमंडळात राहू नये असे त्यांचे मत आहे. पण तेजस्वी यादव मंत्रिपदाचा राजीनामा देणार नाहीत अशी भूमिका राजदने घेतली आहे. त्यामुळे बिहारमधील जदयू-राजद-काँग्रेस महाआघाडीचे सरकार अडचणीत सापडले आहे.
आणखी वाचा
दुसरीकडे भाजपाने नितीश कुमारांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. काँग्रेसचे प्रवक्ते हरेंद्र कुमार यांनी सोनिया गांधींनी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती दिली. लालू आणि नितीश यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे सोनिया गांधी चिंतित आहेत. या दोघांनी एकत्र रहावे अशी त्यांची भूमिका आहे. पुढच्या काही दिवसात सर्व काही सुरळीत होईल असे हरेंद्र कुमार म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत हे सरकार वाचवण्यासाठी सोनिया गांधींनी दोन्ही नेत्यांना विनंती केल्याचे हरेंद्र कुमार म्हणाले.
लालू रेल्वेमंत्री असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा उपयोग करुन भारतीय रेल्वे कॅटरींग अँड टुरिजम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसीच्या माध्यमातून खासगी हॉटेल कंपन्यांना बेकायदा लाभ पोहोचवल्याचा आरोप आहे. लालू काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात 2004 ते 2009 दरम्यान देशाचे रेल्वेमंत्री होते. सीबीआयच्या एफआयआरमध्ये लालूंची पत्नी, राबडी देवी, त्यांचा मुलगा तेजस्वी, आयआरसीटीसीचे माजी व्यवस्थापकीय संचालक पीके गोयल आणि सरला गुप्ता यांची नावे आहेत.