नॅशनल हेराल्ड घोटाळ्या प्रकरणी ईडीने आज दिल्लीतील राऊज एव्हेन्यू कोर्टामध्ये झालेल्या सुनावणी वेळी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी १४२ कोटी रुपयांचा लाभ मिळवला, अशी माहिती ईडीने कोर्टात दिली.
आज झालेल्या सुनावणीवेळी कोर्टामध्ये ईडीचं प्रतिनिधित्व करत असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२३ मध्ये ईडीकडून नॅशनल हेराल्डशी संबंधित ७५१.९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. तोपर्यंत आरोपींकडून या उत्पन्नाला लाभ घेण्यात येत होता. गांधी कुटुंबीयांनी केवळ गुन्ह्यातून उत्पन्न मिळवून त्याचे मनी लाँड्रिंग केलं नाही तर ते उत्पन्न आपल्याजवळ ठेवून घेत आणखी गुन्हा केला, असा दावाही ईडीने केला. दरम्यान, आजच्या सुनावणीवेळी कोर्टाने आरोपपत्र आणि इतर कागदपत्रांच्या प्रतींची मागणी करणाऱ्या भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या याचिकेला मंजुरी दिली.
तर बचाव पक्षाचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि आरएस चीमा यांनी आजच्या सुनावणीदरम्यान कोर्टाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, आम्हाला ५ हजार पानांची कागदपत्रे हल्लीच मिळाली आहेत. त्यात मे महिना हा कोर्ट आणि वकिलांसाठी खूप धावपळीचा असतो, त्यामुळे आम्हाला जुनच्या अखेरीपर्यंत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ वाढवून देण्यात यावा. त्यावर कोर्टाने सांगितले की, आज कोर्ट ईडीचा प्राथमिक युक्तिवाद ऐकून घेणार आहे. त्यानंतर या प्रकरणाला जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलता येईल. तसेच हे प्रकरण एपी-एमएलए कोर्टात आहे. तसेच नियमित सुनावणीची आवश्यकता आहे, असेही कोर्टाने स्पष्ट केले. आता या प्रकरणी २ ते ८ जुलै दरम्यान, नियमित सुनावणी होणार आहे.