लडाखचे पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची त्यांची पत्नी गीतांजली वांगचुक यांनी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतरची ही त्यांची पहिली भेट ठरली आहे. या भेटीनंतर गीतांजली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देत सांगितले की, "आज सोनम वांगचुक यांची भेट झाली. आम्हाला त्यांच्या अटकेच्या आदेशाची प्रतही मिळाली आहे, ज्याला आता आम्ही न्यायालयात आव्हान देऊ."
लडाखच्या हितासाठी लढत राहणार!
गीतांजली वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, सोनम वांगचुक यांचे मनोबल आणि जिद्द अजिबात कमी झालेली नाही. त्या पुढे म्हणाल्या की, "सोनम वांगचुक यांच्या धैर्याला माझा सलाम आहे. ते लडाखच्या हितासाठी आपले काम करत राहतील. त्यांनी त्यांना समर्थन करणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानले आहेत." गीतांजली यांच्या भेटीपूर्वी लेह ॲपेक्स बॉडीचे कायदेशीर सल्लागार मुस्तफा हाजी आणि वांगचुक यांचे मोठे बंधू त्सेतन दोरजे ले यांनीही त्यांची भेट घेतली होती.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाला नोटीस जारी केली आहे. 'रासुका'खाली तुरुंगात असलेल्या सोनम वांगचुक यांना तातडीने सोडता येऊ शकत नाही का?, अशी विचारणा न्यायालयाने केली आहे.
गीतांजली यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात मागणी केली होती की, अटकेच्या आदेशाची प्रत कुटुंबाला मिळायला हवी, जेणेकरून अटकेला कायदेशीर आव्हान देता येईल. तसेच, त्यांनी पत्नीला भेटण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. यावर कोर्टाने, आधी नियमानुसार भेटीची मागणी करा आणि ती फेटाळल्यास न्यायालयात या, असे निर्देश दिले होते.
हिंसक आंदोलनानंतर झाली होती अटक
लडाखमध्ये २४ सप्टेंबर रोजी मोठा हिंसक विरोध झाला होता. या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले होते. या घटनेनंतर सोनम वांगचुक यांना रासुका अंतर्गत अटक करण्यात आली आहे.