“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 20:06 IST2025-09-28T20:04:33+5:302025-09-28T20:06:42+5:30
Ladakh Sonam Wangchuk News: सोनम वांगचूक यांच्या पत्नीने त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
Ladakh Sonam Wangchuk News: गेल्या बुधवारी लडाखच्या लेहमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचे पाकिस्तानशी काही संबंध आहेत काय, याचा पोलिस कसून तपास करीत आहेत. अटकेत असलेल्या वांगचूक यांना राजस्थानातील जोधपूर तुरुंगात हलवण्यात आले आहे. यानंतर आता सोनम वांगचूक यांच्या पत्नीने पाक लिंकचा दावा आधारहीन असल्याचे म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सोमन वांगचूक यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानशी संबंध आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. सोनम वांगचूक नेहमीच गांधीवादी पद्धतीने आंदोलने करतात, असा दावाही पत्नी गीतांजली यांनी केला आहे. २४ सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी गीतांजली यांनी सुरक्षा दलांना जबाबदार धरले आहे. सोनम वांगचूक यांनी कधीही हिंसाचारासाठी चिथावणी दिली नाही. त्यांनी तर शांततापूर्ण आणि अहिंसक मार्गाने आंदोलनाचे नेतृत्व केले. परिस्थिती बिघडण्यास सीआरपीएफने केलेली कारवाई जबाबदार आहे, असा आरोप गीतांजली यांनी केला.
हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लर्निंग (HIAL) च्या सह-संस्थापक गीतांजली यांनी सांगितले की, सोनम वांगचूक यांना अटक झाल्यापासून त्यांच्याशी काहीही बोलणे केलेले नाही. वांगचूक आणि त्यांच्या संस्थेवरील सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत, यावर गीतांजली यांनी भर दिला. त्यांनी शुक्रवारी आदेश पाठवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु आम्हाला अद्याप ते मिळालेले नाही. आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू, असेही गीतांजली यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वांगचूक यांच्या आंदोलनाचा एक व्हिडीओ सीमापार पाठवल्याप्रकरणी एका पाकिस्तानी गुप्तहेर एजंटला अटक करण्यात आली असून, या अनुषंगाने वांगचूक यांच्या पाकिस्तानी संबंधांचा तपास केला जात आहे. वांगचूक यांच्याविरुद्ध परदेशातून मिळणारा निधी आणि विदेशी चलन नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणीही चौकशी सुरू आहे.