पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:30 IST2025-09-30T18:24:35+5:302025-09-30T18:30:28+5:30
सोनम वांगचुक पाकिस्तानला का गेले होते याचे उत्तर त्यांची पत्नी गीतांजली यांनी दिलं.

पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
Sonam Wangchuk Wife on Leh Ladakh Violence: लडाखमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी लेहमध्ये हिंसक आंदोलन झालं ज्यात चौघांचा मृत्यू झाला आणि ७० हून अधिक जण जखमी झाले. लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबाबदार धरले. त्यानंतर पोलिसांनी वांगचूक यांना हिंसाचार भडकवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक केली. वांगचुक यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
याआधी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंग्मो यांनी त्यांच्या पतीचे पाकिस्तानशी संबंध असल्याच्या आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले. सोनम हे हवामान बदलाशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेले होते, पण त्यांनी तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची प्रशंसा केली होती, असं गीतांजली म्हणाल्या. हे लक्षात घ्यावे की २७ सप्टेंबर रोजी लडाखच्या डीजीपींनी वांगचुक यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप केला होता.
आता गीतांजली अंग्मो यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनम वांगचुक यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाष्य केलं. "सोनम वांगचुक केवळ हवामान परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानात गेले होते. ही परिषद संयुक्त राष्ट्र आणि एका पाकिस्तानी मीडिया हाऊसने आयोजित केली होती. हवामान परिषदेत सहभागी होऊन कोणी आयएसआय एजंट कसा बनू शकतो. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि सोनम वांगचुक यांना फसवण्यासाठी केलं जात आहे. जेव्हा लडाख सरकारने चिनी टॅब्लेट खरेदी केले तेव्हा सोनम वांगचुकने आपण गोळ्यांऐवजी चीनचं आर्थिक नुकसान कसं होईल याचा विचार केला पाहिजे हे सांगितले होते.अशी व्यक्ती देशद्रोही कशी असू शकते?" असा सवाल गीतांजली यांनी केला.
भारतीय क्रिकेटपटूंना राष्ट्रद्रोही ठरवाल का?
"फेब्रुवारीमध्ये, आम्ही संयुक्त राष्ट्रसंघ आणि डॉन मीडियाने आयोजित केलेल्या हवामान बदल शिखर परिषदेत सहभागी झालो. जर भारताने चीनसोबत क्रिकेट खेळले आणि खेळाडू तिथे गेले, तर त्यांना आणि क्रिकेट संघाला राष्ट्रद्रोही ठरवले जाईल का? आम्ही हिमनद्यांवरील परिषदेत सहभागी झालो होतो. जर कोणी अशा कार्यक्रमात सहभागी झाला तर तो आयएसआय एजंट कसा होईल का? याचा पुरावा काय? गृहमंत्रालयाने याचे उत्तर द्यावे," असेही गीतांजली म्हणाल्या.
सीआरपीएफमुळे हिंसाचार भडकला
"तरुणांच्या आंदोलनाच्या बहाण्याने लादलेला कर्फ्यू निषेधार्ह आहे. हे शांततापूर्ण आंदोलन होते, पण सीआरपीएफने अश्रूधुराचा वापर केल्यानंतर हिंसाचार सुरु झाला. गेल्या सहा दिवसांत आणि त्यापूर्वीच्या चार वर्षांत लेहमध्ये जे घडले ते अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. लेहच्या लोकांपेक्षा कोणीही शांतताप्रिय, देशभक्त आणि राष्ट्रवादी नाही. कर्फ्यू लावण्यासाठी दिलेली कारणे बरोबर नाहीत. तरुण शांततेत आंदोलन करत होते. जर सीआरपीएफने अश्रूधुराचा वापर केला नसता तर हिंसाचार उफाळला नसता," असेही गीतांजली यांनी म्हटलं.