मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:04 IST2025-08-04T14:04:09+5:302025-08-04T14:04:44+5:30
Kerala News: गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण हे कमालीचं महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना मुलांना उच्च शिक्षण देणं कठीण होऊन बसले आहेत. मुलाला इंजिनियरिंगचं शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या एका हतबल पित्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे.

मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षण हे कमालीचं महाग झाल्याने सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना मुलांना उच्च शिक्षण देणं कठीण होऊन बसले आहेत. मुलाला इंजिनियरिंगचं शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या एका हतबल पित्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. केरळमधील पथानामथिट्टा जिल्ह्यातील ४७ वर्षीय व्ही.टी. शिजो असं जीवन संपवणाऱ्या पित्याचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती देताना केरळ पोलिसांनी सांगितले की, व्ही. टी. शिजो यांच्या मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी निवड झाली होती. मात्र मुलाच्या कॉलेजमधील प्रवेशासाठी फीच्या पैशांची तरतूद करणं त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे ते निराश झाले होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार शिजो यांना मोठ्या आर्थिक चणचण भासत होती. यावर्षाच्या सुरुवातीलाच शिजो यांच्या शिक्षिका असलेल्या पत्नीच्या शाळेतील नियुक्तीवर कोर्टाने शिक्कामोर्तब केलं होतं. अशा परिस्थितीत त्यांचं कुटुंबं १२ वर्षांपासून थकित असलेलं वेतन मिळण्याची वाट पाहत होतं.
शिजो यांच्या पत्नीला फेब्रुवारीपासून वेतन मिळणं सुरू झालं होतं. मात्र जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून मागच्या १२ वर्षांपासून थकीत असलेली रक्कम देण्यात कथितपणे उशीर होत होता. दरम्यान, पोलिसांच्या अंदाजानुसार कुटुंबासमोरील आर्थिक संकट आणि मुलाच्या कॉलेजमधील प्रवेशासाठी पैशांची जुळवाजुळव करता न आल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे. आता शिजो यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.