आपल्या आजारी आईला घरात कोंडून ठेवून, एक मुलगा त्याच्या पत्नीसह पुण्य मिळविण्यासाठी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी प्रयागराजला गेला. म्हातारी आई तीन दिवस एकटी राहिली. खूपच भूक लागल्यानंतर तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचं कुलूप तोडलं तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्काच बसला. उपाशी असल्यामुळे ती वृद्ध महिला प्लास्टिक खाण्याचा प्रयत्न करत होती. शेजाऱ्यांनी लगेच वृद्ध महिलेला जेवण दिलं.
नात्याला काळीमा फासणारी ही घटना झारखंडमधील रामगड जिल्ह्यातून समोर आली आहे. अरगड्डा सरका येथे राहणाऱ्या एका सीसीएल कर्मचाऱ्याने त्याच्या ६५ वर्षीय आईला घरात कोंडून ठेवलं. तो पत्नी आणि मुलांसह प्रयागराज कुंभ स्नानासाठी गेला. त्याची आई भुकेने व्याकूळ झाली होती आणि मदतीसाठी ओरडू लागली. आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घराचे कुलूप उघडलं आणि आत गेले आणि परिस्थिती पाहून त्यांनी त्यांच्या विवाहित मुलीला माहिती दिली.
वृद्ध महिलेची मुलगी आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रामगड पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जवळच्या लोकांच्या मदतीने वृद्ध महिलेला घराबाहेर काढून उपचारासाठी रामगड सदर रुग्णालयात नेण्यात आलं. या प्रकरणात, जेव्हा मुलाशी फोनवर संपर्क साधला तेव्हा त्याने सांगितलं की आम्ही रात्री ११ वाजता निघालो होतो आणि जाण्यापूर्वी आईला जेवण दिलं होतं. घरात सर्व अन्नपदार्थ होते आणि आईनेच आम्हाला कुंभमेळ्याला जाण्यास सांगितलं. आईची तब्येत ठीक नव्हती. यामुळे तिला सोबत घेऊन आलो नाही.
या प्रकरणात रामगड पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर कृष्ण कुमार म्हणाले की, वृद्ध महिला घरात बंद असल्याची माहिती मिळाली होती आणि मुलगा, पत्नी आणि मुलं प्रयागराज कुंभमेळ्याला गेले होते. घराच्या मुख्य गेटचं कुलूप तोडल्यानंतर महिलेची सुटका करण्यात आली आणि तिला उपचारासाठी रामगड सदर रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी कारवाई केली जाईल. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.