अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा गरजेची, रा. स्व. संघाचे नेते भय्याजी जोशी यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 07:26 IST2025-01-24T07:25:31+5:302025-01-24T07:26:23+5:30
Bhaiyaji Joshi News: अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले.

अहिंसेच्या रक्षणासाठी कधी कधी हिंसा गरजेची, रा. स्व. संघाचे नेते भय्याजी जोशी यांचे विधान
अहमदाबाद -अहिंसा या संकल्पनेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसा आवश्यक असते, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी गुरुवारी सांगितले. अहमदाबाद येथे गुजरात विद्यापीठाच्या मैदानावर आयोजिलेल्या हिंदू आध्यात्मिक परंपरा आणि सेवा मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. भारताने शांततेच्या मार्गावर सर्वांना सोबत घेऊन जायला हवे, असेही ते म्हणाले.
जोशी म्हणाले की, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदू सदैव तत्पर असतात. त्यासाठी हिंदूंना अशा काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला दुसरे लोक अधर्म म्हणतील. आपल्या पूर्वजांनी धर्मरक्षणाचे काम उत्तम प्रकारे केले आहे. पांडवांनी अधर्माचा नाश करण्यासाठी काही नियम, संकेत बाजूला ठेवले. त्याची उदाहरणे महाभारतातील लढाईत दिसून येतात. हिंदू धर्मात अहिंसेला महत्त्व आहे. मात्र अहिंसेचे रक्षण करण्यासाठी कधी कधी हिंसेचा वापर करावा लागतो. अन्यथा अहिंसा ही संकल्पना टिकू शकणार नाही. नेमका हाच संदेश पूर्वजांनी दिला आहे. जो सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करतो, तोच शांतता प्रस्थापित करू शकतो. (वृत्तसंस्था)
बलवान भारत व बलवान हिंदू हे जगासाठी उपकारक
ते म्हणाले की, एखादा धर्म दुसऱ्यांच्या श्रद्धांवर गदा आणू पाहात असेल तर त्यावेळी शांतता नांदणार नाही. भारताने वसुधैव कुटुम्बकम हा विचार जगाला दिला आहे. सर्व देशांना सोबत घेऊन वाटचाल करणे हे काम भारताशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही.
बलवान भारत व बलवान हिंदू समाज हे जगासाठी उपकारक आहेत. भारत दुर्बल, शोषित व्यक्तींचे रक्षण करण्यास समर्थ आहे. काही धार्मिक संस्थाच नि:स्वार्थ सेवा करतात असा एक गैरसमज आहे.
मात्र आपली मंदिरे, गुरुद्वारांमध्ये दररोज एक कोटी लोकांना मोफत जेवण दिले जाते. हिंदूंच्या संस्थांचे काम केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून ते शाळा, गुरुकुल, रुग्णालयेही चालवितात, असेही जोशी यांनी सांगितले.