हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : १० मे रोजी जाहीर झालेल्या भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही घटकांकडून आणि त्यांच्याशी संलग्न समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. या शस्त्रसंधीमुळे हे शत्रुत्व थांबले; परंतु टीकाकारांनी त्याला धोरणात्मक चूक किंवा शरणागती असे संबोधले आहे.
शस्त्रसंधी म्हणजे दहशतवादाच्या विरुद्धच्या प्रयत्नांतील ठोस कृती असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले. तथापि, भाजप व संघ परिवारातील अनेक जण याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात.
कोलकाता येथील आरएसएसशी संलग्न असलेले सायन लाहिरी यांनी हा निर्णय म्हणजे पाश्चात्य दबावापुढे शरणागती असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, या देशातील नागरिकांना जिहादीवादावर अंतिम तोडगा हवा होता. उजव्या विचारसरणीच्या शेफाली वैद्य यांनी शस्त्रसंधीला निराशाजनक असे संबोधले आहे. अर्थात, मोदी सरकारच्या व्यापक रणनीतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला.
एक्सवर व्यक्त करत आहेत अस्वस्थता
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य स्वपन दासगुप्ता यांनी एक्सवर आपली अस्वस्थता व्यक्त केली आणि म्हटले की, ही घोषणा पक्षाच्या समर्थकांना रुचली नाही. विशेषत: ती अचानक केली गेली, तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याचे जे तर्क लावले जात आहेत त्यामुळेही ते रुचले नाही.
गुवाहाटी येथील भाजप नेते मून तालुकदार यांनी या निर्णयावर टीका केली. यात स्वसंरक्षणाची कमतरता आहे, असे म्हटले, तसेच त्यांनी असाही आग्रह धरला की भारताने पुढे जाऊन पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपल्यात समाविष्ट करायला हवे होते.