जवानांनी हाणून पाडला ४ दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमधील घुसखोरीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:52 IST2025-07-01T09:52:19+5:302025-07-01T09:52:39+5:30

जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला.

Soldiers foil infiltration attempt by 4 terrorists in Jammu and Kashmir | जवानांनी हाणून पाडला ४ दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमधील घुसखोरीचा प्रयत्न

जवानांनी हाणून पाडला ४ दहशतवाद्यांचा जम्मू-काश्मीरमधील घुसखोरीचा प्रयत्न

सुरेश एस. डुग्गर

जम्मू  : जम्मू-काश्मीरमधील पूंछ-राजौरी क्षेत्रातील नियंत्रण रेषेवर जैश-ए-मोहम्मदच्या चार दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला. त्यांना भारतीय हद्दीत घुसण्यासाठी मदत करणारा वाटाड्या मोहम्मद अरिफ (२८) या पाकिस्तानी नागरिकास अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

रविवारी दुपारी जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना घेऊन भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असताना मोहम्मदला सुरक्षा जवानांनी ताब्यात घेतले, तर चार दहशतवादी सीमेनजीक असलेल्या एका खडकाळ उतारावरून उडी मारून पाकिस्तानच्या हद्दीत पळून गेले. यातील काही दहशतवादी जखमी झाले असल्याची शक्यता आहे. आरिफ हा पाकव्याप्त काश्मीरमधील दतोते गावचा रहिवासी आहे. त्याला हाजुरा पोस्टजवळील गमभीर भागात अटक करण्यात आली. या परिसरातील घनदाट जंगलाच्या आडोशाने दहशतवाद्यांकडून घुसखोरी सुरू असल्याचे लक्षात आल्यावर जवानांनी कारवाई केली.

वाटाड्याकडून मोबाइल, २० हजार पाकी रुपये जप्त

दहशतवाद्यांचा वाटाड्या मोहम्मद आरिफकडे एक मोबाइल फोन आणि सुमारे २०,००० पाकिस्तानी रुपये सापडले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या लगतच्या भागात राहत असल्याने तेथील भौगोलिक स्थितीची पूर्ण माहिती आहे.

पाकिस्तानी लष्कराकडून प्राप्त होणाऱ्या आदेशावरून तो दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचे काम करत होता. त्याची कसून चौकशी सुरू असून त्यातून अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Soldiers foil infiltration attempt by 4 terrorists in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.