नवी दिल्ली - नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. निजामुद्दीन भागातून पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. त्यानंतर ही अटकेची कारवाई झाली असून आज दुपारी साकेत कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे.
मेधा पाटकर यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही अटक केली. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ मध्ये मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. साकेत कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांना कोर्टात हजर न राहणे आणि जाणुनबुजून शिक्षेशी निगडीत आदेशाचे पालन न करणे असा ठपका ठेवला. कोर्टाचा अवमान करून सुनावणीपासून पळ काढण्याचा हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे पाटकरांना कोर्टासमोर हजर करणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं होते.
कोर्टाच्या आदेशात काय?
कोर्टाने त्यांच्या आदेशात म्हटलं होते की, पुढील तारखेसाठी दोषी मेधा पाटकर यांच्याविरोधात दिल्ली पोलीस आयुक्त कार्यालयातून अजामीनपात्र वॉरंट जारी करावे. पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार आहे. जर पुढच्या सुनावणीत पाटकर यांनी शिक्षेच्या आदेशाचं पालन नाही केले तर कोर्ट त्यांना दिलेल्या शिक्षेचा पुर्नविचार करून त्यात आणखी बदल करू शकते असं लिहिलं आहे. मेधा पाटकर यांनी मागील वर्षी मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेल्या शिक्षेविरोधात अपील केले होते. या अपीलात त्यांना जामीन मिळाली होती त्याशिवाय ५ महिने जेल आणि १० लाखांच्या दंडाची शिक्षा स्थगित करण्यात आली होती.
प्रकरण काय?
दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ साली मेधा पाटकर यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. विनय कुमार त्यावेळी अहमदाबाद इथल्या एनजीए नॅशनल कौन्सिल फॉर सिविल लिबर्टीजचे प्रमुख होते. मेधा पाटकर यांनी २५ नोव्हेंबर २००० साली एक पत्रक जारी करत विनय कुमार हे पळपुटे आणि देशद्रोही असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणी मेधा पाटकर यांना कोर्टाने दोषी ठरवत त्यांना शिक्षा सुनावली होती.