म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी
By बाळकृष्ण परब | Updated: December 19, 2020 15:48 IST2020-12-19T15:47:41+5:302020-12-19T15:48:29+5:30
Jairam Ramesh apologized : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे.

म्हणून, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी NSA अजित डोवाल यांच्या मुलाची मागितली माफी
नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या जयराम रमेश यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोभाल यांची माफी मागितली आहे. विवेक डोवाल यांनी एक वक्तव्य आणि लेखावरून जयराम रमेश आणि कारवां या नियतकालिकाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान फौजदारी मानहानीच्या खटल्यात माफी मागताना जयराम रमेश यांनी सांगितले की, निवडणुकीच्या वेळी रागाच्या भरात विवेक डोवाल यांच्यावर आपण आरोप केले होते. मी याबाबतच्या सत्यता पडताळून पाहिली पाहिजे होती.
मी विवेक डोवाल यांच्याविरोधात विधाने केली होती. मी निवडणुकीच्या काळात रागाच्या भारात त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मी या आरोपांबाबत शहानिशा करणे गरजेचे होते, असे रमेश यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत विवेक डोवाल यांनी सांगितले की, जयराम रमेश यांनी या प्रकरणात माफी मागितली आहे. आम्ही तिचा स्वीकारही केला आहे. मात्र रमेश यांचा लेख प्रसिद्ध करणाऱ्या कारवां या नियतकालिकावरील मानहानीचा खटला सुरूच राहणार आहे.
विवेक डोवाल यांनी कारवां नियतकालिक आणि जयराम रमेश यांच्याविरोधात मानहानी करणारा लेख प्रकाशित केल्याबद्दत तक्रार दाखल केली होती. विवेक डोवाल हे एक परकीय गुंतवणूक असलेली कंपनी चालवत आहेत तसेच तिचे प्रमोटर हे संशयास्पद पार्श्वभूमी असलेले आहेत, असा दावा लेखातून करण्यात आला होता.
तर कारवां नावाच्या नियतकालिकाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले होते. अजित डोवाल यांचा मुलगा विवेक डोवाल यांचा केमेन आयलँडवर एक हेज फंड आहे. तसेच हा हेज फंड २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर केवळ १३ दिवसांनी नोंद करण्यात आला होता, असा दावा या लेखात करण्यात आला होता.