राजस्थानमधील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय असलेल्या SMS हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये सुमारे चार महिन्यांपूर्वी लागलेली भीषण आग हा केवळ अपघात नसून, सरकारी यंत्रणेचं धक्कादायक अपयश असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशी समितीच्या अहवालाने त्या रात्रीचा थरार उघड केला आहे, जिथे वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि जबाबदार लोक कर्तव्यापासून पळ काढताना दिसले.
नातेवाईकांनी दिली आगीची माहिती
आगीची माहिती सर्वात आधी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नाही, तर रुग्णांच्या नातेवाईकांनी दिली. रात्री ११:३० च्या सुमारास ICU-2 मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याची माहिची नातेवाईकांनी वारंवार कर्मचाऱ्यांना दिली, पण कोणीही हालचाल केली नाही. दोन-तीन वेळा सांगूनही कर्मचाऱ्यांनी मौन पाळलं. जेव्हा स्टोअर रूममधून धुराचे लोट बाहेर येऊ लागले, तेव्हा कुठे यंत्रणेला जाग आली.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नियोजनातील गंभीर चूक
तपासात असं समोर आलं की, ICU-2 चे मूळ नियोजन १२ बेडचं होतं. परंतु, बेड नंबर-१२ हटवून तिथे 'स्टोअर रूम' बनवण्यात आली. ही स्टोअर रूम रुग्णांच्या बेडला लागूनच होती आणि त्यात औषधं, कापूस-कात्रण आणि स्पिरिटसारखे अत्यंत ज्वलनशील पदार्थ ठेवले होते. याच साहित्याने आगीसाठी इंधनाचं काम केलं.
अर्धा तास 'चावी' शोधण्यात वाया
स्टोअर रूमला टाळं होतं. धूर निघत असतानाही सुमारे ३० मिनिटं कर्मचारी चावी शोधत राहिले. प्रभारी दीनदयाल अग्रवाल आणि कमल किशोर गुप्ता यांनी टाळं लावल्यानंतर चावी कुठे ठेवली, हे कोणालाही सांगितलं नव्हतं. धक्कादायक म्हणजे चौकशी समितीलाही ती चावी अखेरपर्यंत सापडली नाही.
मदतीऐवजी बॅगा उचलून कर्मचारी पळाले
फॉल्स सीलिंगमध्ये आग पसरू लागली आणि दिवे वितळू लागले. दरम्यान, नर्सिंग ऑफिसर उदयसिंह याने वॉर्ड बॉय अमितला टाळं तोडण्यास सांगितलं आणि स्वतः नर्सिंग स्टेशनवरून आपली काळी बॅग उचलून ICU मधून पळ काढला. समितीने आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्याच्या या वागण्याला अत्यंत बेजबाबदार ठरवलं आहे.
नातेवाईक ठरले देवदूत
ICU बेड नंबर-७ वर भरती असलेल्या कनक सैनी यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, रात्री ११:४० ला त्यांना फोनवर शॉर्ट सर्किटची माहिती मिळाली. ते धावत ICU मध्ये पोहोचले आणि रुग्णाला उचलून बाहेर काढलं. यावेळी नर्सिंग कर्मचारी योगेश बाहेर पळताना दिसला. आग वाढल्यावर योगेश आणि उदय दोघांनीही आपले ड्युटी पॉईंट सोडले होते.
सीसीटीव्ही फुटेजने सत्य उघड
रात्री ११:४९ वाजता वॉर्ड बॉय अमित ICU च्या दारावर कोणाशी तरी बोलताना दिसतो. त्याच वेळी रुग्ण शीला यांना त्यांचे पती प्रेम सिंग ओढत बाहेर आणतात. काही सेकंदांनंतर दुसरा रुग्ण बेडसह बाहेर काढला जातो. २९ सेकंदांनंतर पाचवा रुग्ण ट्रॉलीवर बाहेर येतो, पण या संपूर्ण काळात वॉर्ड बॉय एकाही रुग्णाला मदत करताना दिसत नाही.
अलार्म होते, पण वाजलेच नाहीत!
ICU मध्ये फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर होते, पण त्या रात्री एकही अलार्म वाजला नाही. अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीची जबाबदारी नर्सिंग अधीक्षकांवर होती, मात्र तपासात समोर आले की, अंतर्गत यंत्रणेची कधीही तपासणी झाली नव्हती. फक्त बाहेरील प्रेशर पॉईंट तपासून केवळ औपचारिकता पूर्ण केली जात होती.
चार महिन्यांनंतर आलेल्या या अहवालाने स्पष्ट केलं आहे की, ही आग केवळ शॉर्ट सर्किटमुळे लागली नव्हती, तर निष्काळजीपणा, अव्यवस्था आणि जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीमुळे पसरली. या हलगर्जीपणामुळे ६ जणांना आपला जीव गमवावा लागला.
Web Summary : A fire at Rajasthan's SMS Hospital, due to negligence and system failure, led to six deaths. Relatives reported the fire while staff ignored warnings. Faulty planning, a locked storeroom, and fleeing personnel compounded the tragedy, highlighting systemic irresponsibility and a lack of fire safety measures.
Web Summary : राजस्थान के एसएमएस अस्पताल में आग, लापरवाही और सिस्टम की विफलता के कारण, छह लोगों की मौत हो गई। रिश्तेदारों ने आग की सूचना दी जबकि कर्मचारियों ने चेतावनियों को अनदेखा किया। दोषपूर्ण योजना, एक बंद स्टोररूम और भागते कर्मियों ने त्रासदी को और बढ़ा दिया, जिससे व्यवस्थित गैरजिम्मेदारी और आग सुरक्षा उपायों की कमी उजागर हुई।