‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 13:35 IST2025-12-12T13:34:52+5:302025-12-12T13:35:39+5:30
Sleeper Vande Bharat Express Train Updates: पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कधी सुरू होणार, याबाबत देशभरातील प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.

‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
Sleeper Vande Bharat Express Train Updates: आताच्या घडीला भारतीय रेल्वेत वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता सर्वोच्च शिखरावर आहे. एकेकाळी राजधानी, शताब्दी या ट्रेनची चलती असायची. परंतु, याची जागा आता वंदे भारत ट्रेनने घेतली आहे. आताची वंदे भारत ट्रेन चेअर कार प्रकारातील आहे. वंदे भारत ट्रेनच्या १६० सेवा आताच्या घडीला देशभरात सुरू आहेत. यानंतर आता स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याच्या तयारींनी वेग घेतला आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचे दोन प्रोटोटाइप तयार असून, याची देशभरात चाचणी घेण्यात आली आहे. याबाबत आता एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
नियमित वंदे भारत ट्रेनमध्ये दिवसा प्रवासासाठी चेअर-कार सीटिंगची सुविधा आहे. नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी डिझाइन केलेली आहे. यात ऑटो-सेन्सिंग दरवाजे, टच-फ्री फिटिंगसह बायो-डायजेस्टर टॉयलेट, पॅडिंगसह चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले बर्थ, मऊ प्रकाशयोजना आणि एर्गोनॉमिक लेआउट असेल, असे म्हटले जात आहे.
स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबत एका प्रश्नाचे लेखी उत्तर दिले. स्लीपर वंदे भारत ट्रेन लांब आणि मध्यम अंतरावर रात्रीच्या प्रवासासाठी स्वदेशी पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे. अशा दोन रेकची निर्मिती करण्यात आली आहे आणि लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. या ट्रेनमध्ये कवच प्रणाली आणि उच्च अग्निसुरक्षा मानके आहेत. सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. धोक्याच्या परिस्थितीत प्रवाशांसाठी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलटसाठी आपत्कालीन संप्रेषण प्रणाली उपलब्ध आहेत, असेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
देशाला मिळणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन
देशाला लवकरच स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सेवेत येणार आहे. भारतीय रेल्वे दिल्ली ते पाटणा दरम्यान देशातील पहिली रात्रीची स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करू शकते, असा कयास बांधला जात आहे. या ट्रेनमध्ये १६ डबे असतील. पटणा आणि दिल्ली दरम्यानचे १००० किलोमीटरचे अंतर ८ तासांत पूर्ण करण्याचा दावा केला जात आहे. स्लीपर वंदे भारत ट्रेनचा वेग १६० किमी/ताशी असेल.
दरम्यान, दिल्ली-पाटणा ट्रेनचा तिकीट दर काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. असे मानले जाते की, स्लीपर वंदे भारत ट्रेनचे तिकीट राजधानी एक्स्प्रेससारख्या प्रीमियम सेवांसाठी प्रवाशांना मिळणाऱ्या शुल्काइतकेच असू शकेल. ट्रेनचा मार्ग, वेळापत्रक आणि दर याबद्दलची माहिती लवकरच अपेक्षित आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात ही ट्रेन सुरू होऊ शकते.