In six days, petrol will cost Rs. Diesel price hiked by Rs | सहा दिवसांत पेट्रोल १.५९ रु. डिझेल १.३१ रुपयांनी महागले
सहा दिवसांत पेट्रोल १.५९ रु. डिझेल १.३१ रुपयांनी महागले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाच्या तेलप्रकल्पांवर हल्ल्यानंतर जगभरातील कच्च्या तेलाच्या बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. त्यामुळे गत सहा दिवसांत दिल्लीत पेट्रोलचे दर १.५९ रुपये, तर डिझेलचे दर १.३१ रुपये प्रति लीटरने वाढले आहेत. २०१७ पासून पेट्रोलचे दर दररोज ठरवले जात आहेत. तेव्हापासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे.

रविवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आणि पेट्रोल प्रति लीटर ७३.६२ रुपये प्रति लीटरवर पोहोचले. दिल्लीत डिझेलचे दर १८ पैशांनी वाढले आणि प्रति लीटरसाठी डिझेल ६६.७४ रुपयांवर पोहोचले. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिसूचनेनुसार इंधनाच्या दरात सलग सातव्या दिवशी वाढ झाली आहे. १७ सप्टेंबरपासून पेट्रोलच्या दरात एकूण १.५९ रुपयांची वाढ झाली आहे. याच काळात डिझेल १.३१ रुपयांनी महागले आहे. 

सौदी अरेबियातील प्रकल्पांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात पाच टक्क्यांची घट झाली आहे.
अर्थात, सौदी अरेबियाने स्पष्ट केले आहे की, पुरवठा लवकरच सामान्य केला जाईल, पण तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर अनेक वर्षे दिसून येईल.

सौदीतून भारताला किती होतो तेलपुरवठा?
भारत आपल्या गरजेपैकी ८३ टक्के तेल आयात करतो. भारत आपल्या तेल आयातीपैकी पाचव्या हिश्श्यासाठी सौदीवर अवलंबून आहे. सौदी हा भारताचा सर्वात मोठा दुसरा तेल पुरवठादार आहे. सौदी अरेबियाकडून भारताला दर महिन्याला २० लाख टन कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो. सप्टेंबर महिन्यात यातील १२ ते १३ लाख टनांचा पुरवठा झाला आहे. उर्वरित पुरवठा लवकरच मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदी अरेबियाच्या मंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा कायम ठेवण्याचा विश्वास सौदीने व्यक्त केला आहे.

Web Title: In six days, petrol will cost Rs. Diesel price hiked by Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.