साहेब, मी जिवंत आहे, माझी पेन्शन सुरू करा; वृद्ध महिलेची सरकारी दरबारी विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 15:44 IST2022-11-02T15:43:54+5:302022-11-02T15:44:24+5:30
हे प्रकरण नरैनी क्षेत्रातील सरस्वाह गावातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला मागील १० वर्षापासून पेन्शन मिळत होती.

साहेब, मी जिवंत आहे, माझी पेन्शन सुरू करा; वृद्ध महिलेची सरकारी दरबारी विनवणी
बांदा - उत्तर प्रदेशातील बांदा येथे एका वृद्ध महिला जिल्हा अधिकाऱ्याकडे पेन्शनसाठी चकरा मारत आहे. साहेब मी जिवंत आहे, सचिवानं मला मृत दाखवून माझी पेन्शन थांबवलीय. माझी पेन्शन लवकर सुरू करा अशी विनवणी वृद्ध महिला अधिकाऱ्यांकडे करत आहेत. मात्र तिच्या विनवणीची कुणीही दखल घेत नाही. जानेवारी २०२२ पासून या वृद्ध महिलेची पेन्शन रोखण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडे फेऱ्यामारून आता महिला थकली आहे. तिच्याकडे गावातून तहसिल कार्यालयात येण्याइतपतही पैसे नाहीत.
हे प्रकरण नरैनी क्षेत्रातील सरस्वाह गावातील आहे. याठिकाणी राहणाऱ्या ७२ वर्षीय महिलेला मागील १० वर्षापासून पेन्शन मिळत होती. परंतु जानेवारी २०२२ मध्ये अचानक तिच्या खात्यावर येणारी पेन्शन बंद झाली. या वृद्ध महिलेने बँकेत याबाबत विचारणा केली असता विभागाकडूनच तिची पेन्शन रोखल्याचं सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने तहसिल कार्यालयाच्या अनेक चकरा मारल्या तरी कुणीही ऐकलं नाही. इकडून तिकडे फेऱ्या मारल्यानंतर गावातील सचिवाने ऑनलाईन अर्ज करत महिलेला मृत घोषित केल्याचं पुढे आले. त्यामुळे या महिलेची पेन्शन थांबवण्याचा प्रकार उघड झाला.
अनेक महिन्यांनंतरही महिलेला कुठलीही मदत मिळाली नसल्याने तहसिल कार्यालयात पोहचलेल्या या महिलेने SDM ला तक्रार केली. SDM ने महिलेच्या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश दिलेत. परंतु या प्रकारचे अनेक प्रकरणं उघड झाली. याबाबत SDM रजत वर्मा यांनी सांगितले की, वृद्ध महिलेचा आधार क्रमांक आणि बँक खाते नंबर वेगवेगळे आहे. त्यांच्याकडे अन्य कागदपत्रे मागितली आहेत. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर या प्रकरणातील कुणी दोषी आढळले तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"