पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 10:33 IST2019-01-30T10:33:12+5:302019-01-30T10:33:28+5:30
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानला ईडीची नोटीस
नवी दिल्ली- पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. राहत फतेह अली खानला सक्तवसुली संचालनालया(ईडी)नं नोटीस बजावली आहे. त्यानं FEMA या कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक राहत फतेह अली खान हा परकीय चलनाची स्मगलिंग करत होता. ईडीनं त्याच्याकडून यासंदर्भात उत्तर मागितलं आहे.
राहत फतेह अली खाननं अवैधरीत्या 3,40,000 यूएस डॉलर कमावले आहेत. त्यातील जवळपास 2,25,000 डॉलरची त्यांनी स्मगलिंग केल्याचा आरोप आहे. चौकशीत ईडीचं समाधान न झाल्यास गायक राहत फतेह अली खानला मोठा दंड भरावा लागू शकतो. जर त्यानं दंड भरला नाही, तर त्याला लूक आऊट नोटीसही पाठवली जाणार आहे. तसेच भारतातील त्याच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात येणार आहे. तत्पूर्वी 2011मध्ये गायकला दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सव्वालाख डॉलरसह पकडण्यात आलं होतं. त्यावेळी राहत फतेह अली खान त्या रकमेशी संबंधित कागदपत्रांची पूर्तता करू शकला नव्हता.
गायकाच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राहत फतेह अली खान यानं अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये गाणं गायलं आहे. त्याच्या सुफियाना अंदाजातील रोमँटिक गाणी लोकप्रिय आहेत. भारतात पाकिस्तान कलाकारांना बंदी असतानाही राहत फतेह अली खानला भारतात गाण्याची संधी दिली जात होती. या गायकानं सलमानच्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.