गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 19:06 IST2025-10-14T19:05:21+5:302025-10-14T19:06:40+5:30
Maithili Thakur Election: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम लागला. गायिका मैथिली ठाकूरने मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
Maithili Thakur Election News: आपल्या आवाजामुळे संगीत क्षेत्रात ठसा उमटवणारी गायिका मैथिली ठाकूरने आता राजकारणात पाऊल ठेवले आहे. मैथिली ठाकूरने मंगळवारी पाटणा येथे भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून मैथिली भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे एका विषयाला पूर्ण विराम दिला. मात्र, निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढणार, याबद्दलचे गूढ कायम आहे.
मैथिली ठाकूरने भाजपचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी राजदचे आमदार भरत बिंद हेही भाजपमध्ये दाखल झाले.
#WATCH | Ahead of #BiharElection2025, folk and devotional singer Maithili Thakur joins the BJP in Patna, Bihar, in the presence of state BJP chief Dilip Jaiswal. pic.twitter.com/F2kUKihHPO
— ANI (@ANI) October 14, 2025
निवडणूक लढवण्याबद्दल मैथिली ठाकूर काय बोलली?
मैथिली ठाकूर भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी पाटणामध्ये आली होती. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर तिला माध्यमांच्या प्रतिनिधींनी निवडणूक लढवण्याबद्दल विचारणा केली. त्यावर ती म्हणाली की, माझा उद्देश निवडणूक लढवणे हा नाहीये. पण, पक्ष मला जो आदेश देईल, त्याचे मी पालन करेन."
मैथिली ठाकूरसाठी विद्यमान आमदाराचे तिकीट कापणार?
मैथिली ठाकूरने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ती निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राजकीय वर्तुळातून तसे दावेही केले जात आहेत. मैथिली ठाकूरला भाजप दरभंगा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे.
दरभंगा जिल्ह्यातील अलिनगर विधानसभा मतदारसंघातून मैथिली ठाकूर निवडणूक लढवताना दिसू शकते. सध्या या मतदारसंघाचे आमदार मिश्रीलाल यादव आहेत, त्यांचा पत्ता कट होणार असल्याचे निश्चित झाले असल्याचीही चर्चा आहे. भाजपने ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात तब्बल १० विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे.