संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:57 IST2021-11-22T15:56:45+5:302021-11-22T15:57:57+5:30
सिख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेच्या भारत विरोधी कारवाया काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा खलिस्तानी संघटना सक्रीय झाल्या आहेत.

संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवा अन् १ कोटींचं बक्षीस मिळवा!, खलिस्तानी संघटनेची जाहिरातबाजी
जिनेव्हा-
सिख फॉर जस्टिस (SFJ) नावाच्या खलिस्तानी संघटनेच्या भारत विरोधी कारवाया काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर आता पुन्हा एकदा खलिस्तानी संघटना सक्रीय झाल्या आहेत. शेतकरी आंदोलक सरकार विरोधात संसदेवर ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करणार आहेत. पण त्याआधीच सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानं आंदोलक शेतकऱ्यांमध्ये आंदोलनाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आता आंदोलक शेतकऱ्यांना लालुच दाखवण्यासाठी खलिस्तानी संघटनेनं संसदेवर आयोजित मोर्चाच्या दरम्यान संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवल्यास बक्षीस जाहीर केलं आहे.
राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या अनेक महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्या शेतकरी आंदोलकांकडे खलिस्तानी संघटनेनं देग-तेग फतेह रॅली काढण्याचं आवाहन केलं आहे. भारताहून हजारो किमी दूरवर बसून पंजाबला भारतापासून वेगळं करण्याचं स्वप्न खलिस्तानी संघटना पाहात आहेत. यासाठी दररोज काही ना काही कारवाया रचण्याचा प्रताप संघटनेकडून केला आहे. याच संदर्भात आता २९ नोव्हेंबर रोजी आयोजित मोर्चात संसदेवर खलिस्तानी ध्वज फडकवणाऱ्याला १,२५,००० अमेरिकी डॉलरचं ( जवळपास १ कोटी रुपये) बक्षिस दिलं जाईल असं जाहीर केलं आहे.
गुरपतवंत सिंग पन्नू यांनी आग ओकली
सिख फॉर जस्टिसचे (SFJ) सल्लागार गुरपतवंत सिंह पन्नू (Gurpatwant Singh Pannun) यांनी जिनेव्हातून एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आहे. "भगत सिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी संसदेवर बॉम्बहल्ला केला होता. आम्ही तर फक्त पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांना खलिस्तानी ध्वज फडकवण्याचं आवाहन करत आहोत", असं गुरपतवंत सिंग यांनी म्हटलं आहे.