सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:57 IST2025-08-06T13:56:30+5:302025-08-06T13:57:18+5:30
Sidhu Moosewala News: सिद्धू मूसेवालाची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी...
Sidhu Moosewala News: हरियाणातील सावंतखेडा गावात प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या पुतळ्यावर मंगळवारी (५ ऑगस्ट) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर मूसेवालाच्या आई चरण कौर यांनी सोशल मीडियावर तीव्र दुःख व्यक्त केले आणि हा त्यांच्या मुलाच्या आत्म्यावर हल्ला असल्याचे म्हटले.
आमचे मौन हा आमचा पराभव नाही
चरण कौर म्हणाल्या, आमचे मौन हा आमचा पराभव नाही. माझ्या मुलाचे शत्रू मृत्यूनंतरही त्याला शांततेत राहू देत नाहीत. सिद्धूची २०२२ मध्ये गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती, आता त्याच्या पुतळ्यावर झालेल्या हल्ल्याने तीच जखम पुन्हा ताजी झाली आहे. माझा मुलगा लोकांच्या हक्कांचा आवाज होता. सिद्धू मूसेवाला हे फक्त एक नाव नाही, तर एक चळवळ आहे. आता त्याला शांत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया सिद्धूच्या आईने दिली. दरम्यान, डबवाली पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पुतळ्यावर हल्ला आणि धमकीचा व्हिडिओ
सिद्धू मूसेवालाचा हा पुतळा गेल्या वर्षी जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) प्रदेशाध्यक्ष दिग्विजय चौटाला यांनी बसवला होता. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पुतळ्यावर झालेल्या गोळीबारानंतर चौटाला यांना एका परदेशी मोबाईल नंबरवरुन पुतळ्यावर गोळीबार करतानाचा व्हिडिओ पाठवण्यात आला. व्हिडिओसोबत इशाराही देण्यात आला की, मूसेवालानंतर त्याच्या समर्थकांवर हल्ले केले जातील.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
मीडिया रिपोर्टनुसार, पुतळ्यावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली आहे. टोळीतील सदस्य गोल्डी ढिल्लन आणि अर्जुन बिश्नोई यांनी सोशल मीडियावर दिग्विजय चौटाला आणि गगन खोकरी यांना इशारा दिला की, ते मूसेवाला याला शहीदांचा दर्जा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत. पुतळे भगतसिंग किंवा शहीद सैनिकाचे असावेत, गायकाचे नाही. या विधानामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.