पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 12:01 IST2025-07-12T11:57:10+5:302025-07-12T12:01:29+5:30
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी शाहबाज अंसारी सध्या फरार झाला आहे.

पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!
पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी शाहबाज अंसारी, सध्या फरार आहे. गेल्या महिन्यात त्याला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टातून अंतरिम जामीन मिळाला होता. मे २०२२ मध्ये मूसेवाला यांच्या हत्येसाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला शस्त्रे आणि दारुगोळा पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
जामिनावर सुटलेला अंसारी अचानक गायब!
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी असलेल्या अंसारीला डिसेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. १८ जून रोजी न्यायाधीशांनी त्याच्या पत्नीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला एका महिन्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र, आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, अंसारीचा मोबाईल फोन बंद आहे आणि त्याचे लोकेशन ट्रेस करता येत नाहीये. यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे.
बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती?
एनआयएने कोर्टात सांगितले की, शाहबाज अंसारीने दिलेला फोन नंबर आसाममधील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत आहे. जामिनासाठी जामीनदाराने कथितपणे पैसे घेऊन हे काम केले होते. याशिवाय, अंसारीने ज्या गाझियाबाद येथील एमएमजी रुग्णालयाचा उल्लेख केला होता, तिथे अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होत नाहीत. या धक्कादायक खुलास्यानंतर, NIAने विशेष सरकारी वकील राहुल त्यागी यांच्या माध्यमातून ८ जुलै रोजी अंसारीचा जामीन रद्द करून घेतला. मात्र, अंसारीने कोर्टात हजर होण्याच्या नोटीसकडे दुर्लक्ष केले. त्याच्या वकिलांनी, अमित श्रीवास्तव यांनीही आपल्या अशिलाच्या ठिकाणाबद्दल माहिती नसल्याचे सांगितले.
आधीही जामिनाच्या अटींचा भंग
शाहबाज अंसारीने जामिनाच्या अटींचा भंग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला त्याच्या गर्भवती पत्नीसाठी पाच दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला होता, परंतु त्याने NIAला आपले लोकेशन दिले नाही. त्यामुळे, त्याची ३० दिवसांच्या जामीन वाढवण्याची याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर, ऑक्टोबर २०२३ आणि जानेवारी २०२४ मध्ये अंसारीच्या बहिणीच्या लग्नासाठी केलेल्या जामीन याचिकाही फेटाळण्यात आल्या.
आता अंसारीच्या फरार झाल्याने तपास यंत्रणांना त्याचे गुन्हेगारी नेटवर्क पुन्हा सक्रिय होण्याची भीती वाटत आहे. या घटनेमुळे मूसेवाला हत्या प्रकरणाच्या तपासावर आणि न्यायालयीन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.