Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 13:45 IST2025-05-01T13:44:48+5:302025-05-01T13:45:45+5:30
Rahul Gandhi Meet Shubham Dwivedi Father : पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली.

Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या कानपूर येथील शुभम द्विवेदीच्या कुटुंबाची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. राहुल यांच्याशी बोलताना शुभमचे वडील भावुक झाले. त्यांनी इंदिरा गांधींबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली. शुभमला शहीद दर्जा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहू असं राहुल यांनी कुटुंबीयांना म्हटलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये कानपूरच्या शुभम द्विवेदीचाही समावेश होता. शुभमच्या वडिलांनी राहुल गांधींना म्हटलं की, "जर तुमच्या आजी इंदिरा गांधी जिवंत असत्या तर हे घडलं नसतं." तसेच दहशतवाद्यांवर छोटी-मोठी कारवाई करून चालणार नाही. तर त्यांना खूप मोठा धडा शिकवायला हवा असं शुभमच्या कुटुंबीयांनी म्हटलं. राहुल यांना भेटल्यानंतर शुभमचं कुटुंब भावुक झालं.
"लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
शुभमसोबत त्याची पत्नी ऐशन्याही पहलगामला गेली. ऐशन्याने राहुल गांधींना सांगितलं की, दहशतवाद्यांनी त्यांना धर्माबद्दल विचारल्यानंतर गोळीबार सुरू केला. "मी म्हणाले होते की मलाही गोळी घाला, पण त्यांनी ते केलं नाही. ते म्हणाले की, तू जाऊन सरकारला सांग" असं ऐशन्याने सांगितलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अनेक कठोर पावलं उचलली आहेत.
दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात एक नवीन खुलासा समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला दहशतवाद्यांना बेताब व्हॅलीवर हल्ला करायचा होता परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी आपला प्लॅन बदलला आणि बैसरन व्हॅलीला टार्गेट केलं. दहशतवाद्यांनी पहलगाममधील सर्व पर्यटन स्थळांची रेकी केली होती. दहशतवाद्यांनी आडू व्हॅली, बेताब व्हॅली आणि बैसरनची रेकी केली होती. या हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांसह दोन स्थानिक दहशतवादी आणि पाच ओव्हरग्राऊंड वर्करचा समावेश होता. हे लोक आठवडाभर पहलगामच्या जंगलात फिरत होते.