अॅमेझॉनवरुन स्फोटकांची खरेदी अन् PayPal ने दिले पैसे; पुलवामा हल्ल्याबाबत मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 20:27 IST2025-07-08T20:21:34+5:302025-07-08T20:27:46+5:30
एफएटीएफने पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

अॅमेझॉनवरुन स्फोटकांची खरेदी अन् PayPal ने दिले पैसे; पुलवामा हल्ल्याबाबत मोठा खुलासा
Pulwama Attack: देशाला हादरवून सोडणाऱ्या पुलवामा हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ला आणि गोरखनाथ मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याबाबत एफएटीएफचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके अमेझॉनवरून खरेदी करण्यात आली होती तर पेपलद्वारे पैसे दिले गेले होते अशी माहिती समोर आली आहे. या अहवालात दहशतवादी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्स आणि डिजिटल मनी ट्रान्सफरचा वापर करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जगात दहशतवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या निधीवर लक्ष ठेवणारी संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या नवीन अहवालात हा मोठा खुलासा झाला आहे. अहवालानुसार, दहशतवादी संघटना आता शस्त्रे खरेदी करण्यासाठी आणि निधी मिळवण्यासाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन पेमेंट सेवांचा वापर करत आहेत. अशातच जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतातील २०१९ मधील पुलवामा हल्ला आणि २०२२ मधील गोरखनाथ मंदिर हल्ला याचा उल्लेख करत एफएटीएफने या घटनांमध्ये ऑनलाइन प्लॅटफॉर्मने महत्त्वाची भूमिका बजावली असं म्हटलं.
"एका दहशतवाद्याने अमेझॉनवरून अॅल्युमिनियम पावडर मागवली होती, ज्यामुळे आयईडी स्फोटाची ताकद वाढली. गोरखनाथ हल्ल्यातील आरोपींनी पेपल आणि व्हीपीएन वापरून सुमारे ६.७ लाख किमतीचे परदेशी व्यवहार केले होत. आयसिस समर्थकांना निधी पाठवला आणि ठिकाण लपवले. गेल्या १० वर्षांत फिनटेक आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे दहशतवाद्यांना स्वस्त, जलद मार्ग मिळाला आहे. दहशतवादी आता ई-कॉमर्समधून ३डी प्रिंटेड शस्त्रे, रसायने आणि इतर उपकरणे खरेदी करत आहेत," असं एफएटीएफने म्हटले आहे.
एफएटीएफने सदस्य देशांना व्हीपीएन, पीटूपी पेमेंट आणि ई-कॉमर्स प्रक्रियांवर कडक देखरेख ठेवावी लागेल, कारण हे आता दहशतवाद्यांसाठी संसाधने उभारण्याचे एक नवीन साधन बनले आहेत, असा इशारा दिला.
दरम्यान, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. या भ्याड हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. याच्या प्रत्युत्तरात काही दिवसांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता.