गुवाहाटी :आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी, धुबरी जिल्ह्यात दुर्गा पूजेदरम्यान शूट अॅट साइटचा आदेश जारी राहील असे म्हटले आहे. याचे कारण म्हणजे, भारत-बांगलादेश सीमेवर सुरक्षेसंदर्भातील नवी चिंता. हिमंत म्हणाले, "यापूर्वी शूट अॅट साइट आदेश 13 जूनला सांप्रदायिक हिंसाचारानंतर लागू करण्यात आला होता. आता दुर्गा पूजेदरम्यान कसल्याही प्रकारची अशांतता निर्माण होऊ नये, यामुळे हा आदेश लागू राहील."
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा म्हणाले, सरकारने संरक्षण संस्थांनी दिलेल्या इनपुटवर धुबरी आणि दक्षिण सालमारा हे विशेष संवेदनशील भाग मानले आहेत. आम्हाला इतर भागात काहीही अडचण नाही. धुबरी आणि दक्षिण सालमारा हेच आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेत. कारण हे दोन्ही भाग सीमेला लागू आहेत.
धुबरी आणि सालमारा संवेदनशील भाग -हिमंत म्हणाले, "धुबरीमधील नागरिकांना बांगलादेशातून फोन येत होते. परिसरात अनेक असंवेदनशील कारवाया घडत आहेत. दुर्गापूजेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आम्ही सतर्क आहोत. कुठल्याही प्रकारचा हिंसाचार अथवा अशांतता निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही पूर्वी दिलेला शुट अॅट साइटचा आदेश रद्द न करता वाढवत आहोत." तसेच, "रात्रीच्या वेळी कोणी संशयास्पद हालचाली करताना दिसून आल्यास, त्याला गोळी घातली जाईल, असेही ते म्हणाले.
बांगलादेशातून येताहेत धमकीचे फोन -मुख्यमंत्री म्हणाले, या भागातील लोकांना बांगलादेशातून धमकीचे फोन येत असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे. हे फोन कोणी केले, हे पोलिसांना समजले आहे. तपास अंतिम टप्प्यात आहेत. आम्ही अली हुसेन बेपारी नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी जेएनबीशी संबंधित आहे.