Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 15:52 IST2026-04-06T15:51:01+5:302026-04-06T15:52:27+5:30
Unknown Vehicle Crashes Into Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
Delhi Assembly Security Scare:दिल्ली विधानसभा परिसरात एका अज्ञात कारने सुरक्षा यंत्रणेला चकवा देत थेट आत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. बॅरियर तोडून विधानसभा परिसरात प्रवेश केल्यानंतर, संबंधित कारने तेथून पळ काढला. या अनपेक्षित घटनेमुळे तिथे तैनात असलेले सुरक्षा रक्षक काही काळ गोंधळून गेले. ही घटना विधानसभेच्या गेट क्रमांक २ जवळ घडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी अचानक एक भरधाव कार गेटजवळ आली. चालकाने कारचा वेग कमी न करता थेट सुरक्षेसाठी लावलेला बॅरियर तोडून विभानसभेच्या आवारात प्रवेश केला. सुरक्षा यंत्रणांना सावध होण्याची संधी मिळण्यापूर्वीच ही कार अत्यंत वेगाने परिसरातून बाहेर पडली. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विधानसभेच्या प्रवेशद्वारावर आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे, जेणेकरून कारचा क्रमांक आणि चालकाची ओळख पटवता येईल.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर विधानसभेच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, सर्व नाक्यांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ही सुरक्षेतील एक गंभीर चूक आहे. संबंधित कारचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने म्हटले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या विधानसभा क्षेत्रात इतका मोठा निष्काळजीपणा कसा झाला, याचा सखोल तपास सुरू आहे.