शॉकिंग ! RTI मधून विचारले विकासाचे प्रश्न, उत्तरादाखल 'मिळाले वापरलेले कंडोम'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 13:26 IST2019-01-17T13:23:30+5:302019-01-17T13:26:14+5:30
सन 2001 पासून सुरू करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी मागवली होती.

शॉकिंग ! RTI मधून विचारले विकासाचे प्रश्न, उत्तरादाखल 'मिळाले वापरलेले कंडोम'
जयपूर - राजस्थानमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने विकासासंदर्भात माहिती मागविली होती. मात्र, त्यांस शासनाकडून मिळालेल्या बंद पाकिटात माहितीऐवजी चक्क वापरलेले कंडोम मिळाले आहेत. येथे हनुमानगड जिल्ह्यातील भादरा तहसीलमध्ये हा प्रकार घडला आहे. चानी बदी ग्रामपंचायकडून आरटीआयच्या उत्तरादाखल हे बंद पाकिट पाठविण्यात आले होते.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, राजस्थानचे विकास चौधरी आणि मनोहर लाल यांनी 16 एप्रिल रोजी एक आरटीआय दाखल केला होता. त्यामध्ये सन 2001 पासून सुरू करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी मागवली होती. या आरटीआयच्या उत्तरादाखल दोघांनाही बंद पाकिटे पाठविण्यात आली. त्यामध्ये वापरण्यात आलेले कंडोम आढळून आले. याबाबत, सुरुवातीला एका बंद पाकिटात वापरलेले कंडोम आढळून आले. त्यामुळे विकास आणि मनोहर लाल यांनी दुसरे बंद पाकिटा गटविकास अधिकारी यांच्यासमक्ष उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र, गटविका अधिकाऱ्यांनी यास असहमती दर्शवली. त्यामुळे या दोन्ही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी गावकऱ्यासमोर हे बंद पाकिट फोडण्याचा निर्णय घेतला. तसेच याचा व्हिडीओही बनविण्यात आला. त्यावेळी, उत्तरादाखल दिलेल्या दुसऱ्या बंद पाकिटातही वापरलेले कंडोम आढळल्याचे पाहून गावकरीही अवाक झाले. दरम्यान, एखादी सरकारी कार्यालय अशाप्रकारे काम कसकाय करू शकते ? असा प्रश्न मनोहरलाल यांनी विचारला आहे. तसेच सरकारच्या या उत्तरामुळे मी मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे म्हटले आहे.