Delhi Mumbai expressway accident news: दिल्ली-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पिकअप गाडीने रस्त्याची सफाई करत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच चिरडले. यात ६ कर्मचारी ठार झाले, तर ५ जण जखमी झाले आहेत.
शनिवारी (२६ एप्रिल) सकाळी हरयाणातील नुह जिल्ह्यातील इब्राहिम बास गावाजवळ हा अपघात झाला आहे.
भरधाव पिकअपने कर्मचाऱ्यांनाच चिरडले
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक भरधाव पिकअप दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. नुह जिल्ह्यातील इब्राहिम बास गावाजवळ स्वच्छता कर्मचारी महामार्गाची सफाई करण्याचे काम करत होते.
भरधाव पिकअपवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांना जोरात धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, सहा कर्मचारी घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी जाऊन मृतांचे पार्थिव उचलले, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी पिकअपच्या चालकाविरोधात कारवाई सुरू केली आहे.
सीसीटीव्हीची घेतली जाणार मदत
पोलिसांनी सांगितले की, अपघाताचा तपास करण्यासाठी सीसीटीव्हीतील फुटेजस इतर पुराव्यांचीही मदत घेतली जाईल. अपघात कसा घडला, याचा तपास केला जाईल.
मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी ते रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून, त्यांची ओळ पटवण्याचे काम सुरू आहे. ओळख पटवून मृतांच्या कुटुंबीयांना याबद्दलची माहिती देण्याची प्रक्रिया वेगाने केली जात आहे.