राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 19:06 IST2025-05-31T19:06:18+5:302025-05-31T19:06:44+5:30
Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

राहुल गांधींना धक्का, मानहानीच्या खटल्यात ती मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका कोर्टाने फेटाळून लावली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भात लंडनमध्ये भाषण करताना केलेल्या कथित अवमानकारक उल्लेखांवरून त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल झालेला आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, राहुल गांधी यांच्यावतीने याचिकाकार सात्यकी सावरकर यांच्या आईची वंशावळ मागण्यात आली होती.
याबाबत न्यायदंडाधिकारी (प्रथण श्रेणी) अमोल शिंदे यांनी सांगितले की, हे प्रकरण कथित आक्षेपार्ह भाषणाशी संबंधित आहे, हिमानी सावरकर यांच्या वंशावळीशी संबधित नाही. हिमानी सावरकर ह्या महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचा धाकटा भाऊ गोपाळ गोडसे याच्या कन्या होत्या.
राहुल गांधी यांच्यावतीने युक्तिवाद करताना मिलिंद पवार यांनी सांगितले की, तक्रारदाराने आपल्या पितृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिली आहे. मात्र मातृपक्षाकडील वंशावळीची माहिती दिलेली नाही. ही वंशावळ सुनावणीमध्ये आवश्यक आहे. मात्र कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. तसेच ही माहिती या सुनावणीत आवश्यक नसल्याचे सांगितले.
याबरोबरच कोर्टाने राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारी सात्यकी सावरकर यांची याचिका फेटाळून लावली आहे. या खटल्याची सुनावणी १० जानेवारी पासून निश्चित झालेली आहे. मात्र राहुल गांधी हे जाणीवपूर्वक आपला युक्तिवाद नोंदवत नाही आहेत, तसेच उशीर करत आहेत, असा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला होता.