पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 07:03 IST2025-07-24T07:02:38+5:302025-07-24T07:03:17+5:30
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे.

पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
नाशिक : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी मंत्रालयात अपील केले आहे. अर्थात, त्यांचे ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे.
वर्षभरापूर्वी पूजा खेडकर यांची वादग्रस्त कारकिर्द चर्चेत आली. त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा वाददेखील चर्चेत आला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर आणि ओबीसी प्रमाणपत्रदेखील संशयास्पद असल्याचे निदर्शनास आल्याने नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे त्यासाठी चौकशीची जबाबदारी देण्यात आली होती. त्या आधारे विभागीय आयुक्तांनी हा निकाल दिला आहे.
गेडाम यांनी त्यांच्याकडे दोन्ही प्रमाणपत्रांच्या पुष्ट्यर्थ अनेक प्रमाणपत्रे मागितली होती. मात्र, नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्रासाठी पुरेशी कागदपत्रे त्या देऊ शकल्या नाहीत.
खेडकर यांनी मंत्रालयात दाखल केले अपील
पूजा खेडकर यांचे वडील वर्ग एकचे अधिकारी असले तरी त्यांनी मूळ सेवा बदलून घेतली हेाती. तसेच आईवडिलांच्या घटस्फोटानंतर आपले उत्पन्न घटले हा त्यांचा मुद्दाही वैध ठरला नाही. स्वत: पूजा यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या शपथपत्रांच्या माहितीतदेखील तफावत आढळल्याने अपूर्ण माहिती तसेच दिलेल्या माहितीतील तफावत या आधारे त्यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी चुकीचे ठरवले; तर दुसरीकडे वंजारी जात म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम ठेवण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांच्या निकालाविरुद्ध खेडकर यांनी मंत्रालयात अपील केले आहे.