Sanjay Raut: “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 15:11 IST2023-01-21T15:10:35+5:302023-01-21T15:11:21+5:30
Sanjay Raut: उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो, असे सांगत जम्मू काश्मीरमधील समस्या आजही कायम असल्याची टीका संजय राऊतांनी केली.

Sanjay Raut: “कलम ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही, काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचं काय झालं?”
Sanjay Raut: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. आताच्या घडीला भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमध्ये आहे. संजय राऊत यांनी जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० कलम रद्द केल्यानंतर मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनांवरून निशाणा साधला आहे. अनुच्छेद ३७० रद्द केल्यावर कुठेच स्वर्ग दिसला नाही. काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे काय झाले, असा थेट सवाल संजय राऊत यांनी मोदी सरकारला केला आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० नाही. मात्र, अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये उद्योग येतील, रोजगार वाढेल, काश्मीर पुन्हा एकदा स्वर्ग बनेल आदी आश्वासने मोदी सरकारकडून देण्यात आली होती. पण आज इथे आल्यानंतर जेव्हा लोकांशी चर्चा केली तेव्हा इथे कुठेच स्वर्ग दिसला नाही, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी यावेळी बोलताना केली.
काश्मिरी पंडितांच्या घरवापसीचे काय झाले?
काश्मिरी पंडितांचा आक्रोश आजही कायम आहे. ते आजही स्वत:च्या घरी ज्यायला घाबरत आहेत. सत्तेत आल्यानंतर त्यांची घरवापसी केली जाईल, असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्याचे काय झाले? अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचलो, तेव्हा मला आश्चर्य वाटले. काही वर्षांपूर्वी आपण जम्मू-काश्मीरच्या ज्या प्रश्नांवर आपण चर्चा करत होतो, तेच प्रश्न आजही कायम आहेत. यादरम्यान राज्यात आणि केंद्रात सरकारे बदलली. मात्र, काश्मीरी पंडित, कायदा सुव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद हे मुद्दे आजही कायम आहेत. गेल्या चार वर्षांपासून इथे राज्यपालांचे शासन आहे. निवडणुका झाल्या नाहीत. येथील मुख्ममंत्री निवास्थानही खाली आहे, तिथे काय होते मला माहिती नाही, या शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, जम्मू काश्मीर आणि बाळासाहेब ठाकरेंचं नेहमीच एक भावनिक नातं राहिलं आहे. त्यानुसार मी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार या यात्रेत सहभागी झालो होतो. हा अतिशय सुंदर अनुभव होता. खरे तर या यात्रेला राजकीय यात्रा मानत नाही. या देशतील जवळपास सर्वच राजकीय पक्षाचे नेते या यात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रात यात्रा आली तेव्हा आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"