Shiv Sena starts ‘Saheb Khana’ for just Rs 10 in Jammu Kashmir | शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू
शिवसेनेकडून 10 रुपयांत जेवण, 'साहेब खाना' योजना सुरू

ठळक मुद्देजम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. युतीची सत्ता राज्यात आल्यानंतर 10 रुपयांत सामान्य माणसांना सकस जेवण दिले जाईल. एक रुपयात हृदयरोग आणि अन्य आरोग्य चाचण्या करण्यासाठी केंद्र उभे केले जाईल, असे आश्वासन दिले आहे. गरिबांना पोटभर जेवण मिळावे यासाठी फक्त 10 रुपयांत थाळी देण्याचे वचन दिले आहे. याचाच आदर्श घेत जम्मू काश्मीरमध्ये गरजू लोकांसाठी 10 रुपयांत 'साहेब खाना' योजना सुरू करण्यात आली आहे. 

शिवसेनेचे जम्मू-कश्मीर प्रदेशाध्यक्ष मनीष सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमध्ये 'साहेब खाना' योजनेचे उद्घाटन करण्यात आले असून शिवसेना भवनात गरजू लोकांना 10 रुपयांत या सेवेचा लाभ घेता येणार आहे. दरदिवशी 500 लोकांसाठी दहा रुपयाप्रमाणे 'साहेब खाना' मध्ये राजमा, भात, पुरी आणि चण्याची भाजी अशा पदार्थांची व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मूचे राजकीय मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, श्री महाराजा गुलाब सिंह हॉस्पिटल व जम्मू तवी रेल्वे स्टेशनवर देखील या योजनेअंतर्गत 10 रुपयांत पोटभर जेवण सुरू करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शिववडा 12 रुपयाला मिळत असताना 10 रुपयांत जेवण कसे देणार अशी टीका विरोधकांकडून शिवसेनेवर होत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केले होते. 

Maharashtra Election 2019: Know,

'वचननामा जाहीर करण्यापूर्वी तज्ज्ञांशी आणि अर्थतज्ज्ञांशी बोलून 10 रुपयांची भोजन थाळी देण्याचा निर्णय झाला आहे. मराठमोळ्या जेवणात 1-2 चपाती, 2-3 भाजी, वरण भात या एका थाळीचा खर्च 40 रुपये आहे. सरकारमध्ये आम्ही आल्यानंतर ही योजना लागू करू. यामध्ये 10 रुपये ग्राहक देईल तर 30 रुपये सरकार अनुदान देईल. वर्षाकाळी 1 हजार कोटी रुपये या योजनेला खर्च येईल. महाराष्ट्रात कोणीही उपाशी राहणार नाही अशी ही योजना आहे. वाढलेल्या उत्पन्नातून हा खर्च केला जाईल त्यासाठी वेगळा कर लादला जाणार नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजा आहे. त्यामुळे अन्नावर सध्या आम्ही भर दिला आहे' असे सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. 

 


Web Title: Shiv Sena starts ‘Saheb Khana’ for just Rs 10 in Jammu Kashmir
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.