... आता भोगायला उरले नाही, तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही; शिवसेनेची अमरिंदर सिंग यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 06:40 AM2021-10-02T06:40:48+5:302021-10-02T06:42:10+5:30

भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार?, शिवसेनेचा सवाल.

shiv sena saamna editorial criticize punjab former cm cpt amarinder singh home minister amit shah meeting |  ... आता भोगायला उरले नाही, तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही; शिवसेनेची अमरिंदर सिंग यांच्यावर टीका

 ... आता भोगायला उरले नाही, तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही; शिवसेनेची अमरिंदर सिंग यांच्यावर टीका

Next
ठळक मुद्देभाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार?, शिवसेनेचा सवाल.

'काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातीलकाँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. पंजाबातील अशांतता व असंतोषामुळे देशाला मोठी किंमत चुकवावी लागली आहे. हजारो लोकांचे रक्त त्यात सांडले. भिंद्रनवाले प्रकरण हा काळा अध्याय होता. ते सर्व पर्व संपवून पंजाबने नवा अध्याय सुरू केला. पंजाबात पुन्हा राजकीय अशांतता निर्माण झाली तर अतिरेकी प्रवृत्ती डोके वर काढतील, याचे भान केंद्रीय गृहमंत्र्यांनी ठेवण्यातच देशाचे हित आहे,' असं शिवेसेनेने म्हटले आहे.

'कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार? केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही,' असेही शिवसेनेने नमूद केले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात? 
देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते!

आता मी काँग्रेसमध्ये थांबणार नाही व भाजपातही जाणार नाही असे पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी स्पष्ट केले आहे. कॅ. अमरिंदर हे भाजपात जाणार नाहीत, पण बाहेर राहून काँग्रेसचा घात करणार, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी ठरवलेले दिसते. पंजाबातील घडामोडींनी काँग्रेसचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर अमरिंदर दिल्लीस आले. ‘‘भाजप नेत्यांना तुम्ही भेटणार काय?’’ या प्रश्नावर अमरिंदर म्हणाले, ‘‘मी भाजप नेत्यांना भेटणार नाही. दिल्लीत माझ्या सामानाची आवराआवर करायला आलो आहे.’’ पण लगेच दुसऱ्या दिवशी ते अमित शाहंना भेटले. शेतकरी आंदोलन, सीमा सुरक्षा यावर आपण चर्चा केली, असे धादांत खोटे ते बोलतात. 

नित्यनेमाने दिल्लीत डोहाळजेवण
राज्याच्या प्रश्नांवर बडतर्फ मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची ही रीत कुठली? केंद्र सरकार हे नवे पायंडे पाडत आहे ते बरे नाही. काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील, पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरटय़ा मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबात सध्या जे घडवले जात आहे ते प. बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडविण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालात भाजप विरोधी पक्षात आहे. तेथेही अनेकदा लोकप्रिय सरकारला डावलून केंद्राचे लोक विरोधी पक्षाला चर्चेसाठी बोलावतात. विरोधी पक्षाच्या सूचनेनुसार प. बंगालसंदर्भात निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात व राज्याच्या बाबतीत केंद्राचे कान भरतात. जणू विरोधकांचे नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असते व त्यासाठी सर्व लोक दिल्लीस जात असतात.

नाराजी ही सर्वच पक्षांत असते. फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे यावर ‘पळवापळवी’चे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते तर कॅ. अमरिंदर यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती. आज मोदी व शाहंच्या हाती सत्ता आहे म्हणून मूठ घट्ट आहे. उद्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल भाजपच्या विरोधात गेले तर त्याचे पडसाद भाजपमध्येही उमटायला वेळ लागणार नाही. प. बंगाल विधानसभा निवडणूक निकालाने अनेकांचे नाक चांगलेच कापले गेले, हे विसरता येणार नाही. 

म्हातारमंडळाचा जी २३ नावाचा गट
पंजाबातील घडामोडी या अंतिम नव्हेत, राजकारणात सोय आणि स्वार्थ यावर कोणतीही मात्रा निर्माण झालेली नाही. पुन्हा मतलब साधणारे लोक सर्वत्रच आहेत. काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱया म्हातार महामंडळाने ‘जी-23’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाटय़ावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱया अर्कां’ना खटकत आहे. त्यामुळेच राहुल यांच्या समोरील अडचणी कशा वाढतच राहतील असा त्यांचा आटापिटा सुरू असतो.

Web Title: shiv sena saamna editorial criticize punjab former cm cpt amarinder singh home minister amit shah meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.