shiv sena mp sanjay raut hits out at modi government over condition of kashmir after abolishing of article 370 | काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल

काश्मीरात आता जमीन खरेदी शक्य, पण तिरंगा फडकेल का?; राऊतांचा मोदी सरकारला 'रोखठोक' सवाल

मुंबई: काश्मीरमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. काश्मीरमध्ये तिरंगा फडकू देणार नसल्याचं विधान पीडीपीच्या अध्यक्षा मेबबूबा मुफ्तींनी केलं. त्यानंतर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटकदेखील झाली. गृह मंत्रालयानं एक अधिसूचना प्रसिद्ध करत देशाच्या कोणत्याही भागातील व्यक्तीला काश्मीरमध्ये जमीन खरेदीची परवानगी दिली. यावरून राऊत यांनी 'सामना'मधील रोखठोक सदरातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

370 कलमाचा निचरा करूनही कश्मीरचा प्रश्न संपला नाही. कश्मीरात आता बाहेरच्यांनाही जमीन खरेदी करता येईल असे सरकारी आदेश आले; पण श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यावर आजही बंदी आहे. मग ते जमिनीचे तुकडे घेऊन काय करायचे?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. कश्मीरची समस्या कायमचीच संपायला हवी. अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न मार्गी लागला. तसा कश्मीरचा प्रश्नही संपावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केला आहे. 

... तो देशद्रोह असल्याचं मी मान्य करतो, काश्मिरी नेत्यांच्या भूमिकेवर संजय राऊत भडकले

राऊत यांच्या लेखातील महत्त्वाचे मुद्दे-
- मोदी हे दुसऱ्या वेळेस पंतप्रधान झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री म्हणून बसले. त्यांनी एक काम केले. ते म्हणजे कश्मीरातील 370 कलम उडवून लावले. '35 अ' कलम संपवले. लडाखला जम्मू-कश्मीरपासून तोडून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला. या घटनेस एक वर्ष झाल्यावर आता जम्मू-कश्मीरमध्ये बाहेरच्या लोकांना जमीन खरेदीस केंद्राने परवानगी दिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

“Nation wants to know!” काश्मीर मुद्द्यावरुन शिवसेनेचा भाजपाला सणसणीत टोला

- कश्मीरमध्ये 370 कलम असल्यामुळे ते एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जगत होते. पुन्हा तेथील राजकीय पक्षांचा दोन दगडांवर पाय. त्यातला एक पाय पाकिस्तानात. हिंदुस्थानच्या केंद्रीय सरकारने मनासारखे केले नाही तर पाकिस्तानप्रेमाचे तुणतुणे वाजवून 'ब्लॅकमेल' करायचे हे आतापर्यंत चालले. ते काही प्रमाणात कमी झाले आहे. मात्र 370 कलम हटवल्यावर कश्मीरातील परिस्थिती सुरळीत होईल असे काही झाले नाही. उलट तेथील लोकांवर, राजकीय हालचालींवर कडक निर्बंध लादले. आजही कश्मीरात लष्कराच्या बंदुकांमुळेच शांतता आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमध्ये आता कोणालाही जमीन खरेदी करता येणार

- कश्मीरचा प्रश्न फक्त पंडित नेहरू किंवा काँग्रेसमुळेच चिघळला हा काही प्रमाणात अपप्रचार आहे. पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी व शांतता राखण्यासाठी त्यांच्या परीने प्रयोग केले. असे 'प्रयोग' अटलबिहारी वाजपेयी यांनीही केले. लाहोरला ते बस घेऊन गेले. मुशर्रफबरोबर आग्रा येथे परिषद घेतली. हा प्रयोगच होता. मोदी-शहा यांनी मेहबुबा मुफ्तींबरोबर भाजपचे सरकार जम्मू-कश्मीरमध्ये बनवले. ते कशासाठी? याकडेही एक शांतता राखण्याचा 'प्रयोग' म्हणूनच पाहायला हवे. 

मेहबुबांच्या वक्तव्यावरून भाजपचा हल्लाबोल, जम्मूमध्ये PDP कार्यालयावर फडकावला तिरंगा

- मेहबुबा मुफ्ती व त्यांचा पक्ष सरळ आझाद कश्मीरच्या बाजूने आहे. जोपर्यंत पुन्हा 370 कलम कश्मीरात लावले जात नाही तोपर्यंत कश्मीरात तिरंगा फडकवू दिला जाणार नाही, अशी बेताल भाषा करणाऱया मेहबुबा मुफ्तीला अटक करून दिल्लीतील तिहार किंवा महाराष्ट्रातील येरवडा तुरुंगात ठेवायला हवे. किंबहुना त्यांची रवानगी अंदमानच्या कारागृहात करायला हवी एवढा त्यांचा अपराध भयंकर आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी तर हिंदुस्थानच्या विरोधात चीनची मदत घ्यायची भाषा केली. हा अतिरेक आहे.

- कश्मीर खोऱयातून 40,000 कश्मिरी पंडितांनी पलायन केले. त्यांची 'घरवापसी' करू व 370 कलम हटवल्यावर पंडितांना त्यांच्या घरी सहज जाता येईल असा 'प्रपोगंडा' केला गेला. तो चुकीचा आहे. एकही कश्मिरी पंडित अद्याप कश्मीर खोऱयात परतू शकला नाही. 'जहाँ हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है.' ही घोषणा प्रेरणादायी आहे. पाकिस्तानप्रेमींना कश्मीरातून उखडून फेकले पाहिजे. पण पाकिस्तानचा विषय हा देशातील निवडणुकांत तोंडी लावण्याचा विषय आहे. कश्मीर हा फक्त आपल्यासाठी एक जमिनीचा तुकडा नाही, त्याहीपेक्षा बरेच काही आहे. 

- कश्मीर ही हिंदुत्वाची, धर्माची भूमी आहे. देव-देवतांची भूमी आहे. आता तिकडे जमिनी वगैरे खरेदी करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चार दिवसांपूर्वीच श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या तरुणांना पोलिसांनी रोखले. तिरंगा फडकवण्यास मज्जाव केला. पुणाच्या भावना दुखावतील म्हणून हा विरोध केला? तिरंगा फडकवल्याने वातावरण बिघडेल म्हणून विरोध केला का? जमिनी खरेदी करायच्या, पण त्या जमिनीवर आमचा तिरंगा फडकवता येत नसेल तर त्या जमिनीच्या तुकडय़ांचा उपयोग काय?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: shiv sena mp sanjay raut hits out at modi government over condition of kashmir after abolishing of article 370

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.