शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:08 IST2025-11-17T19:07:47+5:302025-11-17T19:08:43+5:30
२०२४ च्या विद्यार्थी आंदोलनाने हसीनांची सत्ता उलथवली आणि त्या भारतात निर्वासित झाल्या. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली असून, युनुस सरकारवर राजकीय शत्रूंना संपवण्याचा आरोप आहे.

शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 'मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यां'बद्दल मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. सध्या भारतात निर्वासित म्हणून राहत असलेल्या हसिनांना दोन प्रकरणांमध्ये फाशी, तर इतर तीन प्रकरणांत आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. शेख हसिना सध्या भारताच्या आश्रयाला असून हा निर्णय म्हणजे अमेरिका आणि पाकिस्तानने रचलेला कट असल्याचा दावा राजकीय तज्ञांनी केला आहे.
या निर्णयावर भारतीय तज्ज्ञ आणि माजी राजनैतिक अधिकाऱ्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून, हा निव्वळ राजकीय बदला असल्याचा दावा केला आहे. इतकेच नव्हे, तर यामागे अमेरिका आणि पाकिस्तानचा भारताविरोधी कट असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. संरक्षण विश्लेषक डॉ. ब्रह्म चेल्लानी यांनी या निर्णयाला 'कांगारू न्यायालय' असे संबोधले आहे. "अंतरिम सरकारने कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे. हा न्यायिक निर्णय नसून राजकीय बदला आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले.
माजी उच्चायुक्त वीणा सिकरी यांनी "१,४०० लोक मारले गेले याचे आकडे कुठून आले? या आरोपांना ठोस पुरावा काय?" असा थेट प्रश्न विचारला आहे. तसेच, हसिनांना ज्या घातक आदेशांप्रकरणी शिक्षा झाली, त्याच प्रकारचे 'अशांतता पसरवणाऱ्यांना गोळ्या घाला' असे आदेश युनुस सरकारने दिले असल्याने त्यांनी या निर्णयातील विरोधाभास स्पष्ट केला.
माजी मेजर जनरल संजय मेस्टन यांनी हा संपूर्ण खेळ अमेरिका आणि पाकिस्तानचा असल्याचे स्पष्ट केले आहे. "हे दोन्ही देश बांगलादेशला पाकिस्तानचा वेगळा प्रांत बनवू इच्छित आहेत आणि भारताविरोधी कट म्हणून बांगलादेशला कट्टर इस्लामी देश बनवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे," असे गंभीर विधान त्यांनी केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय बांगलादेशातील लोकशाहीला मारक असून, भारताविरोधी शक्तींच्या कटाचा भाग आहे. हसिनांना बचाव करण्याची संधी न मिळाल्याने आणि राजकीय सूडाची कारवाई स्पष्ट दिसत असल्याने, या निर्णयाचा परिणाम भारत आणि बांगलादेशाच्या द्विपक्षीय संबंधांवर होणे अटळ आहे. बांगलादेशात पुढील काळात राजकीय अस्थिरता आणि हिंसा वाढण्याची शक्यता आहे.
पार्श्वभूमी आणि परिणाम
२०२४ च्या विद्यार्थी आंदोलनाने हसीनांची सत्ता उलथवली आणि त्या भारतात निर्वासित झाल्या. त्यांच्या आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आली असून, युनुस सरकारवर राजकीय शत्रूंना संपवण्याचा आरोप आहे.