दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:08 IST2025-12-19T14:06:38+5:302025-12-19T14:08:41+5:30
Crime News: छत्तीसगडमधील भिलाई येथे गोणीत भरलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सदर महिलेच्या लिव्ह इन पार्टनरसह तीन आरोपींना अटक केली आहे.

दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...
दोन पतींना सोडल्यानंतर तिसऱ्या पुरुषासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्यात लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. छत्तीसगडमधील भिलाई येथे गोणीत भरलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत सदर महिलेच्या लिव्ह इन पार्टनरसह तीन आरोपींना अटक केली आहे. ही घटना परस्परांमधील वाद आणि मद्याच्या नशेमध्ये झाल्याचे प्राथमित तपासामधून उघडकीस आले आहे.
ही घटना सुपेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रा मौर्या अंडर ब्रिजजवळ घडली होती. येथे १३ डिसेंबर रोजी नाल्याजवळ एका गोणीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार स्थानिकांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत गोणी उघडली तेव्हा त्यामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची अवस्था खूपच विद्रूप झालेली असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटवणे कठीण बनले होते.
अशा परिस्थितीत पोलिसांनी महिलेच्या हातावरील टॅटूच्या आधारावर तिची ओळक पटवण्याचे प्रयत्न सुरू केले. यादरम्यान, ही महिला आरती उर्फ बारती बंजारे असल्याचे निष्पन्न झाले. ही महिला गेल्या ४-५ महिन्यांपासून तुलाराम बंजारेसोबत लिव्ह इन रिलेलशनशिपमध्ये राहत होती. या महिलेची याआधी दोन लग्ने झाली होती. तसेच तिला मद्यपानाचे व्यसन होते.
या प्रकरणी पोलिसांनी या महिलेचा लिव्ह इन पार्टनर तुलाराम बंजारे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याने गुन्हा कबुल केला. तसेच गुन्ह्याची कबुली देताना त्याने सांगितले की, ‘’५ डिसेंबर रोजी मी आरतीसोबत घरामध्ये मद्यपान करत होतो. त्यावेळी आम्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी मी रागाच्या भरात आरतीला मारहाण केली आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. त्यामुळे ती खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, तुलाराम याने या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह लपवण्यासाठी मृतदेह बांधून एका गोणीत भरला. त्यानंतर भाऊ गोवर्धन बंजारे आणि रिक्षा चालक शक्ती भौयर यांच्या साथीने रिक्षात भरून मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील चंद्रा-मौर्या अंडर ब्रिजजवळील नाल्यात फेकला. तसेच कुणाला संशय येऊ नये यासाठी आरती ही वडिलांवर उपचार करण्यासाठी नागपूरला गेली आहे, अशी अफवा परिसरात पसरवली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि चौकशी या आधारावर या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान, आरोपी तुलाराम हा याधीही तुरुंगाता जाऊन आलेला असल्याचे तपासातून समोर आले आहे.