नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:19 IST2025-08-01T09:19:01+5:302025-08-01T09:19:54+5:30
एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे.

नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक आणि अनोखं प्रकरण समोर आलं आहे, ज्यात एका महिलेने आपल्या पतीला सोडून पुतण्याशी लग्न केलं आणि त्यानंतर हैदराबादला पळ काढला. विशेष म्हणजे, तिचा पहिला पती शांतपणे तिला सोडून गेला, पण आता ही महिला पुन्हा चर्चेत आली आहे. तिने पहिल्या पतीला थेट आव्हान देत गावात परत येण्याची घोषणा केली आहे.
'ब्रेकअपच्या खोट्या अफवा, आता बघते काय करतोस?'
पुतण्या सचिनसोबत लग्न केलेल्या आयुषीने एका व्हिडीओमध्ये पती विशालवर गंभीर आरोप केले आहेत. “माझा सचिनसोबत ब्रेकअप झाला आहे अशा खोट्या अफवा माझा पहिला पती पसरवत आहे. आता मी जमुईला येऊन त्याच पतीच्या समोर माझ्या नव्या नवऱ्यासोबत (पुतण्या) राहीन. बघते कोण आम्हाला थांबवतोय आणि तो काय बिघडवतो,” असं आयुषीने म्हटलं आहे.
यावर आयुषी पुढे म्हणाली, “मी विशालकडे परत जाणार नाही. आता त्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माझ्या आयुष्यातून देवानेच विशालला बाहेर काढलंय, मग मी का त्याच्याकडे परत जाऊ? विशालच्या त्रासाला कंटाळूनच मी दुसरं लग्न केलं. विशाल इतका खाली उतरला आहे की त्याला देवही माफ करणार नाही. लोकांना वाटतंय की मी विशालसोबत राहीन, पण मी लवकरच गावात परत येऊन त्यांना दाखवून देईन की मी माझ्या पती सचिनच्या घरी राहीन.”
कसं सुरू झालं होतं प्रेमप्रकरण?
आयुषीचं पहिलं लग्न २०२१ मध्ये विशाल दुबेसोबत झालं होतं. त्यांना ४ वर्षांची एक मुलगीही आहे. पण लग्नानंतर २ वर्षांनी आयुषीची जवळची ओळख तिचा नातेवाईक आणि शेजारी असलेल्या सचिन दुबेसोबत वाढली. १५ जून रोजी आयुषी तिचा पती आणि मुलीला सोडून सचिनसोबत घरातून पळून गेली. यानंतर विशालने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर दोन्ही प्रेमी समोर आले आणि २० जून रोजी त्यांनी गावातील एका शिवमंदिरात गावकऱ्यांच्या उपस्थितीत लग्न केलं.
'जाऊ दिलं नसतं तर जीवच घेतला असता'
विशालने आयुषीच्या या निर्णयावर कोणतीही हरकत घेतली नाही. त्याने सांगितलं, “ज्याला मी लहानपणापासून वाढवलं, तोच पुतण्या माझ्या बायकोला घेऊन गेला. दोन वर्षांपासून त्यांचं प्रेमप्रकरण सुरू होतं. कळल्यावर मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकलं नाही. जर मी तिला जाऊ दिलं नसतं, तर तिने माझा जीवच घेतला असता. माझी मुलगी खूप समजूतदार आहे. ती आता आईची आठवण काढत नाही. माझी आई आणि मी मिळून तिला सांभाळत आहोत. आता तीच माझ्या आयुष्याचा आधार आहे. मी दुसरं लग्न करणार नाही, कारण लग्नाच्या नावावरच मला आता तिरस्कार वाटतो.”