आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:37 IST2025-05-01T20:28:26+5:302025-05-01T20:37:26+5:30
Uttarakhand Crime News: टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या घटस्फोटित महिलेची लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या या ३५ वर्षीय महिलेने तिच्या आजारी आईला उपचारांसाठी डॉक्टरकडे टॅक्सी बुक केली होती.

आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक...
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात पडून त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या घटस्फोटित महिलेची लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या या ३५ वर्षीय महिलेने तिच्या आजारी आईला उपचारांसाठी डॉक्टरकडे टॅक्सी बुक केली होती. टॅक्सीचालक मुश्ताक याच्याशी ओळख झाल्यानंतर ती त्याच्या टॅक्सीमधून आईला अनेकदा रुग्णालयात घेऊन गेली. या दरम्यान, दोघांमधील ओळख अधिकच वाढली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते गुरुग्राम येथे येऊन लिव्ह इनमध्ये राहू लागले. ही महिला दोन मुलांची आई होती, तसेच घरकाम करायची. तर मुश्ताक हा टॅक्सी चालवण्याचं काम करायचा.
सुमारे दोन वर्षे लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर सदर महिलेने मुश्ताकवर लग्नासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुश्ताकने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली, तसेच तो उत्तराखंडमध्ये परत गेला. काही काळाने ही महिलाही मुश्ताकला भेटण्यासाठी उत्तराखंडमध्ये गेली. त्यानंतर मुश्ताक तिला बहिणीच्या घरी घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी तो तिला तिथून फिरण्याच्या बहाण्याने नंदा नहर गावात घेऊन गेला.
तिथे मुश्ताक याने या महिलेची चाकूने वार करून हत्या केली. तसेच तिचा मृतदेह बेटशिमध्ये लपेटून कालव्यावरील पुलाखाली लपवून ठेवला आणि फरार झाला. बहीण बऱ्याच दिवसांपासून बेपत्ता असल्याने मृत महिलेच्या बहिणीने गुरुग्रामधील सेक्टर-५ मध्ये बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून आरोपी मुश्ताक याला उत्तराखंड येथून अटक केली. त्याने दिलेल्या माहितीवरून महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.