Ishita Kishore: ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 17:41 IST2023-05-25T17:31:00+5:302023-05-25T17:41:06+5:30
UPSC Topper Ishita Kishore: सोशल मीडियावर अनेकजण इशिता किशोरची जात शोधून काढत ती आपल्याच जातीची असल्याचा दावा करत आहेत. तसेच तिला जातीनिहाय शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी गुगलवर इशिताची जात शोधली आहे.

Ishita Kishore: ती आमच्याच जातीची! UPSC टॉपर इशिता किशोरच्या जातीवरून सोशल मीडियावर हंगामा
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ च्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये एकूण ९३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत इशिता किशोर ही पहिली आली आहे. तिच्या घराला सध्या प्रसार माध्यमांनी गराडा घातला आहे. मात्र याचदरम्यान, सोशल मीडियावर अनेकजण इशिताची जात शोधून काढत ती आपल्याच जातीची असल्याचा दावा करत आहेत. तसेच तिला जातीनिहाय शुभेच्छा देत आहेत. काही लोकांनी गुगलवर इशिताची जात शोधली आहे. तर अनेक जण तिचं वय किती आहे, याबाबतचा शोध घेत आहेत.
यावर्षीच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्शामिनेशनमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. पहिल्या चार क्रमांकावर मुलींनीच कब्जा केला आहे. मात्र सोशल मीडियावर अशा गुणवान विद्यार्थ्यांची जात शोधली जात आहे. अशा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जातीच्या फेऱ्यात अडकवून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कुणी इशिताची जात यादव असल्याचं सांगत आहेत. तर कुणी ती कुशवाहा असल्याचा दावा करत आहेत. तर कुणी तिला ती यादव असल्याचं अधोरेखित करत शुभेच्छा दिल्या आहेत.
इशिताने तिसऱ्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली होती. तिने तिची पदवी दिल्लीतील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून मिळवली आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत इशिताने सांगितले की, गेल्या दोन परीक्षांमध्ये तिला पात्रता परीक्षेचाही अडथळा पार करता आला नव्हता. मात्र तिसऱ्या प्रयत्नात थेट पहिला क्रमांक मिळाला आहे.