तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:59 IST2025-12-10T17:59:20+5:302025-12-10T17:59:48+5:30
Tirupati Mandir: प्रसिद्ध तिरुमाला तिरुपती मंदिरात पुन्हा एकदा घोटाळ्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. याआधी लाडवांमध्ये झालेली भेसळ आणि पराकमणी हुंडी चोरीनंतर आता मंदिरातील शाल घोटाळा उघडकीस आला आहे.

तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं
प्रसिद्ध तिरुमाला तिरुपती मंदिरात पुन्हा एकदा घोटाळ्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. याआधी लाडवांमध्ये झालेली भेसळ आणि पराकमणी हुंडी चोरीनंतर आता मंदिरातील शाल घोटाळा उघडकीस आला आहे. व्हिजिलेन्स अधिकाऱ्यांनी व्यापक तपासानंतर या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. मंदिरात रेशमी शालींच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचं उघडकीस आलं आहे. हा घोटाळा २०१५ पासून २०२५ पर्यंत दहा वर्षे बिनबोभाटपणे सुरू होता. तसेच या घोटाळ्यामुळे मंदिर प्रशासनाला सुमारे ५४ कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
ठेकेदारांनी मंदिराला बनावट रेशमी शालींचा पुरवठा केल्याचे व्हिजिलेंस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कागदावर १०० टक्के पॉलिस्टर सिल्क मिक्स असल्याचे सांगण्यात आले. तसेच त्याच हिशोबाने बिल करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मोठा घोटाळा झालेला होता. या ठेकेदाराने सुमारे १५ हजार शालींचा पुरवठा केला. तसेच त्यातील प्रत्येक शालीची किंमत ही १३८९ रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, शालींचं सत्य समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना या शालींचे नमुने दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये पाठवले. त्यात सेंट्रल सिल्क बोर्डाचाही समावेश होता. लॅबच्या रिपोर्टमधून या शाली ह्या रेशमी नाही तर पॉलिस्टरच्या असल्याचे समोर आले. या रेशमी शालींच्या घोटाळ्याबाबत टीटीडीचे चेअरमन बी.आर. नायडू यांनी सक्त भूमिका घेतली आहे. खरेदी विभागात काही फेरफार झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. याची गंभीर दखल घेत आम्ही याचा तपास एसीबीकडे सोपवला आहे. आता एसीबी याची सखोल चौकशी करेल.