रोजंदारी कामगाराच्या किडनी-लिव्हरमुळे वाचले शशिकलाच्या नव-याचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:54 IST2017-10-04T16:38:34+5:302017-10-04T16:54:55+5:30
व्ही.के.शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर चेन्नईच्या ग्लेनइगल्स ग्लोबल हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लान्टच्या दोन शस्त्रक्रिया एकाचवेळी करण्यात आल्या.

रोजंदारी कामगाराच्या किडनी-लिव्हरमुळे वाचले शशिकलाच्या नव-याचे प्राण
चेन्नई - व्ही.के.शशिकला यांचे पती एम. नटराजन यांच्यावर चेन्नईच्या ग्लेनइगल्स ग्लोबल हेल्थ सिटी हॉस्पिटलमध्ये लिव्हर आणि किडनी ट्रान्सप्लान्टच्या दोन शस्त्रक्रिया एकाचवेळी करण्यात आल्या. या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, नटराजन यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. मंगळवारी रात्री सुरु झालेली ही शस्त्रक्रिया तब्बल साडेसात तास चालली लिव्हर ट्रान्सप्लान्ट विभागाचे संचालक डॉ. के. इल्लानकुमारन यांनी ही माहिती दिली.
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात शशिकला सध्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. अण्णाद्रमुकमध्ये पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम हे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर शशिकलांचा अण्णाद्रमुकमध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. रोजंदारीवर काम करणा-या 19 वर्षीय एन. कार्तिकमुळे एम.नटराजन यांना नवे आयुष्य मिळाले आहे. कार्तिकला मंगळवारी सकाळी 10.30 वाजता डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले.
त्याच्या कुटुंबियांनी कार्तिकचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. सरकारी रुग्णालयातून कार्तिकला डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला खासगी एअर अॅम्ब्युलन्सने चेन्नईला आणण्यात आले. यावेळी सरकारही डॉक्टरही त्याच्यासोबत होता. ट्रान्सप्लान्टव्दारे कार्तिकच्या किडनी आणि लिव्हरचे एम.नटराजन यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात आले.
कार्तिकची एक किडनी सरकारी रुग्णालयाला दान करण्यात आली. त्याचे अन्य अवयव ग्लोबल हॉस्पिटलला डोनेट करण्यात आले असून, ग्लोबल आपल्या पेशंटसाठी त्याचा वापर करणार आहे. एम.नटराजन एप्रिल महिन्यापासून किडनी आणि लिव्हरसाठी वेटिंग लिस्टवर होते.