Shashi Tharoor praises pakistan pm Imran Khan for paying tribute to Tipu Sultan | शशी थरुर यांच्याकडून इम्रान खान यांचं कौतुक; म्हणाले...
शशी थरुर यांच्याकडून इम्रान खान यांचं कौतुक; म्हणाले...

नवी दिल्ली: टिपू सुलतानच्या पुण्यतिथीनिमित्त त्याचं स्मरण करणाऱ्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं काँग्रेस नेते शशी थरुर यांनी कौतुक केलं. 4 मे रोजी टिपू सुलतानची पुण्यतिथी होती. त्या निमित्तानं इम्रान खान यांनी ट्विट करुन त्याची स्तुती केली होती. याबद्दल थरुर यांनी इम्रान खान यांचं ट्विट करुन प्रशंसा केली. मी खान यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. त्यांना भारतीय उपखंडाच्या इतिहासात खरंच रस आहे, असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

इम्रान खान यांनी 4 मे रोजी एक ट्विट केलं होतं. 'आज 4 मे. टिपू सुलतान यांची पुण्यतिथी. या माणसाचं मला नेहमी कौतुक वाटतं. कारण गुलामांसारखं जगण्याऐवजी त्यांनी स्वतंत्र्याची निवड केली. त्यासाठी ते लढले आणि लढता लढता त्यांनी मरण पत्करलं,' असं खान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. याबद्दल शशी थरुर यांनी आज खान यांचं कौतुक केलं. 'इम्रान खान भारतीय उपखंडाच्या इतिहासाचं वाचन करतात. त्यांना या भागाची चिंता आहे,' असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
'महान भारतीय नायका'ची आठवण पाकिस्तानातल्या नेत्यांना येते हे दु:खदायक असल्याचं म्हणत थरुर यांनी अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदींना टोला लगावला. इम्रान खान याआधीही टिपू सुलतानचं कौतुक केलं होतं. फेब्रुवारीत पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत-पाकिस्तानमधले संबंध ताणले गेले होते. त्यावेळी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत खान यांनी टिपू सुलतानाचा उल्लेख केला होता. 


Web Title: Shashi Tharoor praises pakistan pm Imran Khan for paying tribute to Tipu Sultan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.