'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:42 IST2025-08-07T14:41:45+5:302025-08-07T14:42:21+5:30
Shashi Tharoor on Trump Tariff: रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादला आहे.

'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
Shashi Tharoor on Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५०% कर लादल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. आधी त्यांनी २५% कर जाहीर केला होता, मात्र आता रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त २५% कर लादला आहे. यावर आतापर्यंत सरकारसह विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता काँग्रेस खासदार शशी थरुर यांची महत्वाची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी अमेरिकेवरही ५०% कर लावण्याचा सल्ला दिला आहे.
अमेरिकेवरही ५०% कर लादावा
संसद भवन परिसरात मीडियाशी संवाद साधताना शशी काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी भारतावर अतिरिक्त २५% कर लादण्याचा निर्णय अन्याय्यकारक, दुटप्पीपणाचा आणि भारत-अमेरिका संबंधांबद्दल असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असेही म्हटले की, जर अमेरिका भारतीय उत्पादनांवर ५०% कर लादत असेल, तर भारतानेही अमेरिकन वस्तूंवर तेवढाच कर लादला पाहिजे.
VIDEO | Delhi: On US President Donald Trump announcing additional 25 per cent tariff on India, Congress MP Shashi Tharoor (@ShashiTharoor) says, "It will have an impact because we have trade of about $90 billion. If things will get costly by 50 per cent then people will also… pic.twitter.com/8OyMqAt3nr
— Press Trust of India (@PTI_News) August 7, 2025
थरुर पुढे म्हणतात, भारताचा अमेरिकेशी ९० अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जर सर्व काही ५०% महाग झाले, तर तेथील खरेदीदार भारतीय वस्तू खरेदी करणार नाहीत. अमेरिका आपल्याला धमकावून काहीही करू शकत नाही. सध्या आम्ही अमेरिकन उत्पादनांवर सरासरी १७% कर लादतो. मग आपण तिथेच का थांबावे? आपणही ५०% कर लादला पाहिजे. जर अमेरिकेला भारताशी संबंध नको असतील तर भारतालाही अमेरिकेची गरज नाही, अशी थेट प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
चीनला सूट मिळते, मग भारताला का नाही?
चीन भारतापेक्षा रशियाकडून जास्त तेल आणि साहित्य खरेदी करतो, परंतु त्यांना ९० दिवसांची सूट देण्यात आली आहे. जर चीनला सवलत देता येत असेल, तर भारताला लक्ष्य का केले जात आहे? ही मैत्री नाही, तर दबावाचे राजकारण आहे, असेही शशी थरुर यांनी यावेळी म्हटले.